चेन्नई, दि. 2 - नीट परीक्षेविरोधात सुप्रीम कोर्टात लढा देणाऱ्या तामिळनाडूतील विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. एमबीबीएससाठी प्रवेश न मिळाल्यानं एस. अनितानं टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे. एस. अनिताने शुक्रवारी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. 17 वर्षीय एस अनिता तामिळनाडूतील अरियालुर जिल्ह्यातील कुझुमुर गावची रहिवासी होती. बारावीच्या परीक्षेत अनिताला 1200 पैकी 1176 गुण मिळाले होते. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिला वैद्यकीय क्षेत्रात करीअर करायचे होते. पण राज्य सरकारच्या एका अध्यादेशामुळे तिच्या स्वप्नांवर पाणी फेरले होते. राज्य सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि रिव्हॉल्युशनरी स्टुडंट्स अॅण्ड युथ फ्रन्ट (आरएसवायएफ) या विद्यार्थी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी चेन्नईत निदर्शने केली. दरम्यान काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेमका काय आहे प्रकार?गेल्या वर्षापर्यंत तामिळनाडूत मेडिकलसाठी प्रवेश बारावीच्या गुणांवर मिळत होता. मात्र राज्य सरकारने नीट परीक्षेच्या आधारेच मेडिकलसाठी प्रवेश देण्यासंदर्भात एक अध्यादेश जारी केला. त्यामुळे राज्यात नीट परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु होणार होती.पण या विरोधात अनितासह काही विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली. नीट परीक्षेचा अभ्यासक्रम सीबीएससी पॅटर्नवर अधारित असल्याने, ती परीक्षा अतिशय अवघड झाली आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी अनिताने सुप्रीम कोर्टाकडे केली.पण सुप्रीम कोर्टानं 22 ऑगस्टच्या आपल्या निर्णयात नीट परीक्षेनुसार प्रवेश देण्याचा निर्णय दिला. त्यातच अनिताला नीटच्या परीक्षेत केवळ 86 टक्के मिळाल्यानं तिला मेडिकलसाठी प्रवेश मिळाला नाही. अखेर नैराश्येपोटी तिनं आत्महत्या करण्याचे टोकाचं पाऊल उचलले.दरम्यान, अनिताने मेडिकल शिवाय इंजिनिअरिंगसाठीही प्रवेश परीक्षा दिली होती. त्यात तिला चांगले गुण मिळाले होते. विशेष म्हणजे, मद्रास इन्सटिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एरॉनॉटिकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी तिला सहज प्रवेश मिळत होता. पण तिला वैद्यकीय क्षेत्रातच करीअर करायचे असल्याने, तिने इंजिनिअरिंग करणे टाळले.अनिताच्या आत्महत्येनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी कुटुंबाला 7 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. अण्णा द्रमुकचे नेते दिनकरन यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त केला असून अनिताच्या आत्महत्येची बातमी ऐकून आपल्याला धक्का बसल्याचेही म्हटले आहे. तर विरोधी पक्षनेते आणि द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी सरकारशी संपर्क साधून ही दुदैवी घटना असल्याचे म्हटले आहे. दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत, कमल हसन यांनीदेखील अनिताला श्रद्धांजली अर्पण करत दु:ख व्यक्त केले आहे.