जम्मू-काश्मीरमधील रामबन येथील बटोलमध्ये शनिवारी सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीच्या आधी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी अनिता शर्मा यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओत अनिता शर्मा या एका घराच्या छतावर उभे राहून माइकच्यामाध्यमातून लपलेल्या दहशतवाद्यांना बाहेर येण्यास सांगत आहेत. त्या म्हणाल्या, "ओसामा...ओसामा तुम्हाला सर्वांशी बोलायला देऊ. तुम्ही बाहेर या. आम्ही असताना तुम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला कोणीही हात लावणार नाही. बाहेर या. नागरिकांना आधी बाहेर पाठवा. शस्त्रास्त्रांसोबत बाहेर पाठवून द्या."
यानंतर अनिता शर्मा म्हणाल्या, "ओसामा, तुम्हाला 15 मिनिट दिली होती. तुमची वेळ संपली आहे. आता बाहेर या. ओसामा आम्ही तुम्हाला आधीच सांगितले होते की, 15 मिनिटांचा वेळ दिला आहे, तो आता पूर्ण झाला आहे. आता बाहेर या."
दरम्यान, बटोलमध्ये शनिवारी सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. यावेळी जवानांनी प्रत्युत्तर देताच दहशतवाद्यांनी जवळ असलेल्या घराचा आसरा घेतला. तसेच घरातील व्यक्तींना बंधक बनविले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांकडून बंधक व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. चकमकीमध्ये एक जवान शहीद झाला आहे. तर दोन पोलिस जवान जखमी झाले.