पाकिस्तानी नसरुल्लाहच्या प्रेमासाठी पाकिस्तानला गेलेली अंजू भारतात परतली आहे. अंजूने बुधवारी अटारी-वाघा सीमेवरून भारतात प्रवेश केला. सध्या ती बीएसएफ कॅम्पमध्ये असून, तिचा पहिला फोटोही समोर आला आहे. अंजू, पती अरविंद आणि दोन मुलांसह राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवडी येथे राहायची. सहा महिन्यांपूर्वी टुरिस्ट व्हिसावर पाकिस्तानला गेली आणि खैबर पख्तुनख्वा येथे राहणाऱ्या नसरुल्लाहसोबत लग्नही केले. भारतात परतलेल्या अंजूविरोधात काही कारवाई होईल का, याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही.
2020 मध्ये अंजू आणि नसरुल्ला यांची फेसबुकवर ओळख झाली होती. नसरुल्ला पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामधील अप्पर दीर जिल्ह्यातील रहिवासी आहे. फेसबुकवर त्यांची मैत्री वाढली आणि नंतर एकमेकांशी फोनवरही संपर्क सुरू झाला. सुमारे दोन वर्षे हा संवाद सुरू होता. अंजू आणि नसरुल्ला यांनी एकमेकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. नसरुल्लाहने भारतात येण्यास असमर्थता व्यक्त केल्यावर अंजूने पाकिस्तानात येण्यास होकार दिला.
अंजूने पासपोर्टही बनवला, पण अडचण व्हिसाची होती. अंजूने 21 जून रोजी पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसासाठी अर्ज केला होता. अंजूचा पती अरविंदने सांगितले की, अंजू 20 जुलै रोजी अंजूने जयपूरला आई-वडिलांच्या घरी जात अशल्याचे सांगितले. अरविंदने अंजूला अनेकदा फोन केला, मात्र तिचा फोन बंद होता. 23 जुलै रोजी अंजूने तिच्या पतीला व्हॉट्सअॅपवर कॉल करून सांगितले की, ती तिच्या मित्रासोबत लाहोर, पाकिस्तानमध्ये आहे आणि तीन-चार दिवसांनी परत येईल. अंजू पाकिस्तानात गेल्याचे अरविंदला समजताच त्याला धक्का बसला.
काही दिवसांनंतर अंजूने पाकिस्तानी नसरुल्लाहसोबत लग्न केले आणि पाकिस्तानातच राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. आता सहा महिने तिथे राहिल्यानंतर अंजू अचानक भारतात परतली आहे. तिच्या भारतात येण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
कोण आहे अंजू?मूळ राजस्थानची रहिवासी असलेली अंजू भिवडीतील एका ऑटोमोबाईल कंपनीत कामाला होती, तर तिचा पती अरविंद इंडो कंपनीत कामाला होता. अंजूचा पती अरविंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे कुटुंब मूळ उत्तर प्रदेशातील बलिया येथील आहे, तर अंजूचे कुटुंब मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे राहते. अंजू आणि अरविंद यांचा विवाह 2007 साली झाला होता. अरविंदचा धर्म ख्रिश्चन आहे, तर अंजू हिंदू आहे. अंजूने लग्नानंतर धर्मही बदलला होता. त्या दोघांना दोन मुलेही आहेत.