ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ११ - आरक्षणाविरोधात मत व्यक्त करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे दलित विरोधी आणि गरीबांच्या विरोधात असल्याची टीका राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. अण्णा हजारे, मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आता काहीच फरक राहिलेला नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
देश स्वतंत्र झाला त्यावेळी आरक्षणाची गरज होती. पण आता आरक्षणात राजकीय पक्षांनी घुसखोरी केली आहे, आता आरक्षणामुळे देशाला धोका निर्माण झाला आहे असे अण्णा हजारेंनी म्हटले होते. अण्णा हजारेंच्या या विधानानंतर लालूप्रसाद यादव यांनी अण्णांवर टीकास्त्र सोडले आहे. अण्णा हजारे, मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांच्यात काहीच फरक नाही. हे सर्वजण गरीब विरोधी, मागासवर्गीय आणि दलित विरोधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, अण्णा हजारे सध्या राजस्थान दौ-यावर असून या दौ-यात अण्णा हजारेंना धमकीचे पत्र आले आहे. सीकरमध्ये अण्णांची सभा होणार असून या सभेविरोधात धमकी देण्यात आली आहे. अण्णा हे विदेशाचे एजंट असून त्यांना सीकरमध्ये बोलावणे हे अशूभ आहे, त्यांची सभा घेतली तर गोळ्या झाडू' अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. बाईकवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तीने हे धमकीचे पत्र दिले आहे. यानंतर राजस्थान पोलिसांनी अण्णा राहत असलेल्या निवासस्थानाबाहेर व सभेच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.