नवी दिल्ली : गेल्या सहा दिवसांपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण आजच्या दिवशीही सुरुच आहे. मात्र, या आंदोलनावर आज दुपारपर्यंत सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे. अण्णांनी सकाळी कोअर कमिटीची बैठक बोलाविली होती. या बैठकीत पीएमओतून आलेल्या सुधारित मसुद्यावर चर्चा करण्यात आली. तसेच, अण्णांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे अण्णा आज उपोषण सोडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचबरोबर, अण्णांनी उपोषण सोडण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह सुद्धा उपस्थित राहणार आहेत. अण्णांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. त्यांचे वजन तब्बल साडे पाच किलोने घटले असून त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला. तसेच, अण्णांनी आज उपोषण सोडण्याची गरज आहे. तसे न केल्यास त्यांची प्रकृती आणखी खालावणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. याचबरोबर, आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास 15 आंदोलकांची गेल्या काही दिवसांमध्ये प्रकृती ढासळली असून त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरू आहेत. दरम्यान, आंदोलनस्थळी केवळ महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कागद घेऊन येतात. केंद्र सरकारकडून ठोस आश्वासने नाहीत. निव्वळ धूळफेक चालली आहे. मोदी सरकार शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हिताचे नाही. आता मोदी सरकारचीही घरी जाण्याची वेळ आली असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी केली होती.
Anna Hazare Hunger Strike : अण्णांचे उपोषण सुटणार ? देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 11:34 AM