मुंबई - बिजिंग ऑलिंपिक स्पर्धेतील ब्रांझ पदकविजेता बॉक्सर आणि देशातील नामवंत खेळाडू असलेल्या विजेंदर सिंगने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अन्ना हजारेंना चिमटा काढला आहे. देशातील शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी देशभरात पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा दर्शवत, असंच, पण आज अन्ना हजारेंची आठवण येतेय, असे ट्विट विजेंदर सिंगने केले आहे. केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या तीन शेतकरी विधेयकांला विरोध करत पंजाबमधील शेतकऱ्यांनी आज भारत बंदची घोषणा केली होती.
केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कृषी कायदा तयार केल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनांच्या वतीने शुक्रवारी कृषी विधेयकाला कडाडून विरोध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र शासनाच्या प्रतिकात्मक अध्यादेशासह पुतळ्याचे दहन करून संताप व्यक्त केला.अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या वतीने केंद्र शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या देसातील विविध राज्यांत हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात या भागातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते. पंजाब आणि हरियाणात मोठ्या प्रमाणात आंदोलनाची धग पाहायला मिळाली. येथील शेतकऱ्यांनी रेल्वेगाड्याही अडवल्या होत्या.
मोदी सरकारने लागू केलेले शेतकरी विधेयक हे शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्याच हिताचे जास्त असल्याचे सांगत शेतकरी संघटनांकडून विरोध होत आहे. पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी या विधेयकाला विरोध करत आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामाही दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर हरियाणाचा रहिवासी असलेल्या आणि माजी ऑलिंपिकविजेता बॉक्सरने भ्रष्ट्राचार निर्मूलनासाठी मोठं आंदोलन उभारणाऱ्या अन्ना हजारेंची आठवण काढली आहे. असंच, आज अन्ना हजारेंची आठवण आली, असे विजेंदरने म्हटलंय.
आय सपोर्ट भारत बंद, या हॅशटॅगने विजेंदर सिंगने ट्विटरवर पोस्ट केली आहे. विजेंदरची ही पोस्ट रिट्विट करत माजी केंद्रीय कायदामंत्री डॉ. अश्वानी कुमार यांनी त्याचं कौतुक केलंय. तसेच, शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले. याबद्दलही विजेंदरने त्यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, अन्ना हजारे यांनी 2011 साली दिल्लीतील रामलीला मैदानावर मोठे आंदोलन उभारले होते. देशातील भ्रष्टाचाराविरुद्ध अन्नांनी उभारलेल्या या आंदोलनाची इतिहासात नोंद झाली आहे. या आंदोलनातूनच दिल्लीत सत्ताक्रांती झाल्याचेही देशाने पाहिले आहे. त्यामुळे, आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अन्ना गप्प का? असा प्रश्न विजेंदरसह अनेकांना पडलाय.