ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - राष्ट्रपतीपदाची निवडणूक जुलै महिन्यात होणार आहे. गेले कित्येक दिवसांपासून या निवडणुकीसंदर्भात दिल्लीत राजकीय खलबतं सुरु आहेत. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी लालकृष्ण अडवाणी ते शरद पवार अशी अनेक नावं चर्चेत आली असली तरी सत्ताधारी एनडीए आणि विरोधी बाकांवरील युपीएकडून कोण उमेदवार असणार याबद्दल सस्पेन्स अजून कायम आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांची रणनिती धुळीस मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना धक्का बसेल असा उमेदवार उतरवण्याची तयारी करत असल्याचं वृत्त आहे. मोदी ज्या नावांचा विचार करत आहेत त्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नावाचाही समावेश असल्याची कुजबुज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि अण्णा हजारे यांच्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या भेटीदरम्यान याबाबत चर्चा झाल्याचंही बोललं जात आहे. मात्र, याची शक्यता अत्यंत धुसर आहे. कारण अण्णा हजारे हे संघाशी निगडीत नाहीत किंवा त्यांची विचारसरणीही संघाला न पटण्याजोगी आहे. शिवाय ते कट्टर मोदी समर्थकही नाहीत त्यामुळे अण्णा हजारेंच्या नावाची कुजबुज जरी असली तरी शक्यता मात्र अत्यल्प आहे.
दुसरीकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यूपीए महात्मा गांधींच्या नातूंना उतरवण्याची तयारी करत असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. महात्मा गांधींचे नातू आणि बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी हे यूपीएचे राष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उत्तर प्रदेशसह अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकांच्यानंतर सत्ताधारी भाजपाचे संख्याबळ वाढले आहे. शिवाय वायएसआर आणि अन्य छोट्या पक्षांचे समर्थन घेऊन स्वबळावर म्हणजेच संख्याबळासाठी घोडेबाजार कसरत टाळून आपल्या मनातील उमेदवाराला राष्ट्रपती बनवणे मोदींसाठी अशक्य राहीलेलं नाही. या परिस्थितीत कॉंग्रेसप्रणित युपीएने सर्वसहमतीची विरोधकांची सर्वसहमतीने मोट बांधली तरी त्यातून राष्ट्रपतीपदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता दुरावलेली आहे. त्यामुळे विरोधकांचा उमेदवार कोण असणार यापेक्षाही मोदी कोणता उमेदवार देतात याविशयीचे कुतुहल अधिक आहे. मात्र, नेहमीप्रमाणे याहीवेळी मोदींच्या मनात काय आहे यांचा थांगपत्ता लागणं कठीण आहे.