ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 25 - उत्तर प्रदेशमध्ये महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या एकूण 15 सुट्ट्या बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
गेल्या 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीदिनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शाळा आणि कॉलेजमध्ये देण्यात येणा-या महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या सुट्ट्या रद्द करण्याची घोषणा केली होती. यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, सुट्ट्यांमुळे 220 दिवसांपैकी 120 दिवसच शाळा भरते.
दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी अवघ्या दहा दिवसांमध्ये करण्यात आली असून आज झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या एकूण 15 सुट्ट्या बंद करण्याचा निर्णय घेतला. या सुट्ट्यांऐवजी शाळा आणि कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना या दिवशी महापुरुषांबद्दल माहिती देण्यात येणार आहे.
याचबरोबर सध्या उत्तर प्रदेशात सरकारी कर्मचा-यांना वर्षभरासाठी 194 सुट्ट्या मिळतात. त्यामध्ये 40 सार्वजनिक सुट्ट्या आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात सर्वाधिक जास्त सुट्ट्या असल्याचे बोलले जाते.