-व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा, असा दबाव मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्याेत सिंग सिद्धू हे पक्षश्रेष्ठींवर आणत आहेत. त्याच वेळी या दोघांचे पक्षातील विरोधक असे नाव जाहीर करण्याच्या विरोधात आहेत.
सिद्धू हे एकवेळ नेहरू घराण्याचे आवडते होते. याच सिद्धू यांनी वार्ताहरांशी बोलताना एक पाऊल पुढे टाकत म्हटले की, “राज्याचा मुख्यमंत्री मतदार ठरवतील, पक्षश्रेष्ठी नव्हे. पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री ठरवतात, हे तुम्हाला कोणी सांगितले?” मुख्यमंत्री चन्नी स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, “२०२२ च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रिपदासाठीच्या उमेदवाराची घोषणा केली पाहिजे. पक्षाने जेव्हा केव्हा अशा उमेदवाराची घोषणा केली नाही, तेव्हा पक्षाचा पराभव झाला आहे.” २०१७ मध्ये पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला, तेव्हा पक्ष जिंकला. त्याआधी त्याने उमेदवार जाहीर केला नाही, तेव्हा त्याचा पराभव झाला.