नागपूर : काँग्रेसने जारी केलेले घोषणापत्र हे देशद्रोही व फुटीरवाद्यांना खूष करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या माध्यमातून उत्तर दिले. तर राहुल गांधी देशद्रोहाला अपराध मानण्यास नकार देत आहेत. हाच एक चौकीदार व राजकुमार यांच्यातील फरक आहे, अशी टीका परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नागपुरात केली.
नागपुरात महिला मेळाव्यास त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री व भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी उपस्थित होते. केंद्र सरकारने फुटीरवाद्यांच्या सवलती बंद केल्या. मात्र काँग्रेसचे लोक फुटीरवाद्यांशी चर्चा करताना दिसून येतात. मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जगापासून एकटे पाडण्याची संधी भारताकडे होती. मात्र तत्कालीन काँग्रेस सरकारने केवळ पत्र लिहून पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करावी, असे म्हटले होते. मात्र उरी व पुलवामा येथील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सैन्याला पूर्ण मोकळीक दिली होती. सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील समर्थन मिळविले. हा देशाचा सैन्यशक्ती व कूटनीतीचा विजय होता, असे स्वराज म्हणाल्या.
विदेशात एखादा भारतीय संकटात असल्यावर ‘टिष्ट्वट’ करून कळवितो. त्यानंतर २४ तासात त्याला दिलासा मिळालेला असतो. मागील पाच वर्षांत आम्ही विदेशात अडकलेल्या २ लाख २६ हजार लोकांना सुरक्षित देशात परत आणले, असेदेखील स्वराज यांनी सांगितले.