नवी दिल्ली : पंतप्रधानांनी २०१३ ते २०१७ या कालावधीत विदेश दौ-यांसाठी एअर इंडियाचे जे चार्टर्ड विमान वापरले, त्यापोटी किती खर्च झाला, याचा तपशील जाहीर करावा, असा आदेश केंद्रीय माहिती आयोगाने परराष्ट्र खात्याला दिला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २0१४ ते २0१७ या ४ वर्षांत केलेल्या विदेशी दौ-यांमध्ये किती खर्च झाला, याबाबतचा तपशील निवृत्त कमांडर लोकेश बात्रा यांनी केंद्रीय परराष्ट्र खात्याकडे माहितीच्या अधिकारात मागविला होता. मात्र, परराष्ट्र खात्याने अपुरी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्याने, त्यांनी केंद्रीय माहिती आयोगाकडे या प्रकरणी दाद मागितली.पंतप्रधानांच्या विदेश दौ-यामध्ये झालेल्या खर्चाची हवाई दल व एअर इंडियाने पाठविलेली बिले, त्यांचे दिनांक, या बिलांतील रकमेचा सविस्तर तपशील हा विविध कागदपत्रांमध्ये विखुरलेला असून, ती सर्व माहिती एकत्रित करण्यासाठी ब-याच अधिका-यांना कामाला लावावे लागेल, असे परराष्ट्र खात्यातर्फे या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी माहिती आयोगाला सांगण्यात आले.मात्र, हे म्हणणे अमान्य करत, ही सर्व माहिती लोकेश बात्रा यांना देण्यात यावी, असा आदेश केंद्रीय माहिती आयुक्त आर. के. माथुर यांंनी परराष्ट्र खात्याला दिला.जनतेच्या पैशातून व्यवहार-हवाई दल व एअर इंडियाने दिलेल्या बिलांची किती रक्कम देण्यात आली आहे हे जनतेला कळावे म्हणून मी ही माहिती मागविली, असे सांगून बात्रा म्हणाले की, एअर इंडिया तोट्यात आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या दौºयाची एअर इंडियाने जी बिले पाठविली असतील, त्यांची रक्कम वेळेत दिली न गेल्यास, त्या रकमेचे व्याजही द्यावे लागेल. जनतेच्या पैशातून हे सारे व्यवहार होत असतात. राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देऊन, पंतप्रधानांच्या खर्चाचा तपशील जाहीर न करणे हे अयोग्य आहे. एअर इंडियाचे चार्टर्ड विमान जे वापरतात, ते एक प्रकारे ग्राहक ठरतात. ग्राहकाने खर्चाची रक्कम भरली केली का, हे जाणून घेण्यात काही गैर नाही.
मोदींच्या विदेश दौ-यांतील विमानाचा खर्च जाहीर करा, माहिती आयोगाचे परराष्ट्र खात्याला आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:53 AM