नवी दिल्ली : जेएनयूमधील कार्यक्रमात घुसलेल्या बाहेरील लोकांनी ‘भारत को रगडा दो रगडा’, ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा वादग्रस्त घोषणा दिल्या. हे लोक चेहरे झाकून आले होते, असा अहवाल या विद्यापीठाच्या उच्चस्तरीय चौकशी समितीने सादर केला आहे. ९ फेब्रुवारी रोजीच्या या कार्यक्रमात ‘भारत की बर्बादी तक जंग रहेगी’ अशी घोषणा कुणीही दिल्याचे व्हिडिओ फुटेजमध्ये आढळून आले नाही, पण अशा घोषणा दिल्याचा दावा प्रत्यक्षदर्र्शींनी साक्षीच्या वेळी केला आहे. ‘भारत के टुकडे टुकडे कर दो’अशी चिथावणीजनक घोषणाही देण्यात आली नव्हती, असेही या अहवालात नमूद केलेले आहे. प्रो. राकेश भटनागर यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय समितीने हा अहवाल सादर केला आहे. बाहेरील लोकांना विद्यापीठातील कार्यक्रमात हजर राहण्याची परवानगी देणे आणि चिथावणीजनक घोषणा देण्याची मोकळीक देणे ही दुर्दैवी बाब असल्याचे या अहवालात स्पष्ट केले आहे. अर्जावर १८ मार्च रोजी निर्णय... दिल्ली न्यायालयाने देशद्रोहाचे आरोप असलेले उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्या जामीन अर्जावर १८ मार्चपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे. दिल्ली पोलिसांनी या दोघांना जामीन देण्याला विरोध केला. केवळ व्हिडिओ फुटेज नव्हे, तर दहा स्वतंत्र साक्षीदारांच्या जाबजबाबावर आमचा तपास आधारलेला आहे, असे पोलिसांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क) न्यायालयाच्या इशाऱ्यावर आक्षेप - जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार याचा अंतरिम जामीन रद्द करण्यासंबंधी याचिका न्या. प्रतिभा राणी यांनी अन्य खंडपीठाकडे वर्ग करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे सुपूर्द केली आहे. - याचिका फेटाळण्यात आल्यास त्यासंबंधी खर्च याचिकाकर्त्याला द्यावा लागेल, असे न्यायालयाने बजावल्याबद्दल एका याचिकाकर्त्याने आक्षेप घेतला होता. - कन्हैयाला ३ मार्च रोजी सशर्त अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. याचिकाकर्ता न्यायालयीन कक्षात उपस्थित असल्याचे बघून न्यायाधीशांनी याचिका फेटाळण्यासंबंधी खर्च देण्याची तयारी ठेवा असा इशारा दिला होता. हा आमचा हक्क असून न्यायालय अशा प्रकारे घाबरवू शकत नाही, असे वकील आर. पी. लुथ्रा यांनी प्रशांत कुमार उमराव यांची बाजू मांडताना म्हटले. जेएनयू विद्यापीठात भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांचा भाजपने बचाव चालविला आहे. हा पक्ष सर्वात मोठा देशविरोधी आहे. -अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री
बाहेरील लोकांनी दिल्या ‘त्या’ घोषणा
By admin | Published: March 17, 2016 3:45 AM