अहमदाबाद – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानं पुढील मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या विधिमंडळ आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांना विधिमंडळ नेते म्हणून निवडण्यात आलं आहे. त्यामुळे भूपेंद्र पटेल(Bhupendra Patel) हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
कोण आहेत भूपेंद्र पटेल?
भूपेंद्र पटेल हे गुजरात भाजपामधील ज्येष्ठ नेते आहेत. घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांचा जवळपास १ लाखाहून अधिक मतांनी पराभव केला होता.
विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाबद्दल गुजरातमधील पटेल समाजात नाराजी होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकांत भाजपाला विजय मिळणे शक्य नाही, हे स्पष्ट दिसत होते. तसेच, त्यांना गुजरातमधील कोरोना स्थिती नीट हाताळता आली नाही. या तीन महत्वाच्या कारणांमुळे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून विजय रुपाणी यांना हटविण्यात आले, अशी चर्चा आहे. सूत्रांनुसार अमित शाह हे दोन दिवसांपूर्वी अचानक रात्रीच्या सुमारास गुजरातला आले होते. यानंतर लगेचच सकाळी दिल्लीला रवाना झाले. यावेळी त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली, यामध्येच रुपाणी यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला.
विजय रुपाणी यांनी राजीनामा देण्याच्या एक महिना आधी रुपाणी सरकारने महोत्सव साजरा केला होता. त्यानंतर एका महिन्यातच रुपाणींची उचलबांगडी केल्यामुळे खळबळ उडाली. काँग्रेसचे नेते परेश धानानी यांनी यावर बोट ठेवले आहे. जर महिनाभरापूर्वीच रुपाणी सरकारच्या यशाचा महोत्सव साजरा केला तर मग आता चेहरा बदलण्याची गरज का पडली, असा सवाल केला आहे. रुपाणी अपयशी ठरले त्यांचे अपयश झाकण्यासाठी भाजपाने हे सारे रचले आहे, असा आरोप त्यांनी केला.
तर हार्दिक पटेल(Congress Hardik Patel) यांनी ट्विट करत म्हटलंय की, RSS आणि भाजपाच्या(BJP) अंतर्गत सर्व्हेत काँग्रेसचा विजय होत आहे. त्यासाठी विजय रुपाणी यांचा राजीनामा घेतला गेला. ऑगस्टमध्ये RSS आणि भाजपानं हा छुपा सर्व्हे केला. त्यात काँग्रेसला ४३ टक्के मतं आणि ९६-१०० जागा, भाजपाला ३८ टक्के मतं आणि ८०-८४ जागा, आपला ३ टक्के मतं, एमआयएमला १ टक्के मतं आणि इतर अपक्षांना १५ टक्के मतं आणि ४ जागा मिळताना दिसत होत्या असा दावा त्यांनी केला होता.