ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - नोटाबंदी निर्णय अंमलात आणण्यासाठी घाईदेखील केलेली नाही तसंच अविचारानेही याची घोषणा करण्यात आलेली नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले. देशात वर्षभरातील अर्धा व्यवसाय हा दिवाळी सणादरम्यान होतो. हेच मुख्य कारण असल्याने दिवाळीनंतर नोटाबंदी निर्णय लागू करण्यात आला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत आभार व्यक्त करणा-या भाषणादरम्यान मोदींनी अर्थव्यवस्थेसंबंधीत अनेक गोष्टी मांडल्या. याचवेळी त्यांनी नोटाबंदी निर्णयावर स्पष्टीकरण दिले. नोटाबंदीसाठी दिवाळी नंतरचा काळ निवडणं यामागील गणितं समजावून सांगताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, 'ऑपरेशनपूर्वी रुग्णाची प्रकृती स्थिर असली पाहिजे, असे डॉक्टरही सांगतात.
डॉक्टर तेव्हाच उपचार करतो जेव्हा रुग्णाचा बीपी, मधुमेहाची स्थिती ठिकठाक असते. त्यामुळे आम्हीही देशाची अर्थव्यवस्था निरोगी असल्याचे पाहून नोटाबंदीसारखा निर्णय लागू केला.'
यावेळी मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला की, 'भाजपा विरोधकांच्या भूमिकेत असताना आवाज यायचा, कोळसा घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळ्यात किती गेले?. आज परिस्थिती बदलली आहे. आता विरोधकांमधून आवाज येतो, मोदींनी किती आणले?'.
आधीचे सरकार (यूपीए सरकार) आणि आताच्या भाजपा सरकारच्या कामकाजात हाच फरक आहे की पूर्वी जाण्यावर प्रश्न संपायचा, आता येण्यावर प्रश्न उपस्थित केले जातात, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. शिवाय 'स्वच्छ भारत' प्रमाणेच नोटाबंदीचा निर्णय हा भ्रष्टाचार आणि काळा पैसा सफाईचे अभियान आहे, असेही यावेळी मोदींनी नमूद केले.