हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गेल्या दहा दिवसांच्या कालावधीत पाच मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याच्या घोषणेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय लाभ मिळणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. ज्या राज्यांमध्ये भाजप प्रबळ नाही तिथे भारतरत्न पुरस्कारांच्या घोषणेमुळे मतदारांचे लक्ष या पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे.
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याने आंध्र प्रदेशमध्ये भाजपच्या स्थितीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्या राज्यात भाजपला मतदारांचा फारसा पाठिंबा मिळालेला नाही. तसेच तेलंगणातही राजकीय फायदा होणार आहे. चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करून मोदी सरकारने राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरींचे मन जिंकले आहे. ते चौधरी चरणसिंहांचे नातू आहेत. जाट आणि शेतकऱ्यांचा पाठिंबा जयंत चौधरींना आहे. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न दिल्यामुळे तामिळनाडू व दक्षिण भारतातील अन्य राज्यांत भाजपला आणखी अधिक शिरकाव करता येईल, असा त्या पक्षाचा विचार असल्याचे कळते.
माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह
शेतकरी कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य केले समर्पितमाजी पंतप्रधान चाैधरी चरणसिंह हे शेतकरी नेते म्हणूनच ओळखले जातात. शेतकऱ्यांचे हक्क आणि कल्याणासाठी त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केले हाेते. त्यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात याेगदान हाेते. १९२९मध्ये त्यांना इंग्रजांनी तुरुंगातही टाकले हाेते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पावलांवर पाऊल ठेवले.
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव
राजकीय ‘विद्वान’ : आर्थिक उदारीकरणाचे जनक सलग आठ वेळा लाेकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आणि काॅंग्रेस पक्षात ५० वर्षांपेक्षा जास्त काळ राहिल्यानंतर पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान झाले. त्यांना १७ भाषा अवगत हाेत्या. ६० वर्षांच्या वयातही त्यांनी संगणक प्राेग्रॅमिंगच्या २ भाषा शिकल्या हाेत्या. नरसिंह राव यांचे महाराष्ट्राशी घनिष्ट संबंध हाेते.
कृषितज्ज्ञ डॉ. स्वामीनाथन
देशाच्या कृषिक्रांतीचे जनक; संशाेधनासाठी वाहिले आयुष्यस्वातंत्र्यानंतर देशामध्ये अन्नधान्याची टंचाई असतना डाॅ. स्वामिनाथन यांनी महत्त्वपूर्ण संशाेधन करुन कृषिक्रांती घडविली. त्यांनी जास्त उत्पादन देणारे गव्हाचे वाण विकसित केले हाेते. याशिवाय तांदुळवरही त्यांनी संशाेधन केले. बंगालच्या दुष्काळामुळे व्यथित झालेले स्वामीनाथन यांनी संपूर्ण आयुष्य कृषी संशाेधनासाठी वाहिले.