मुंबई - लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात पार पडत असलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांनी अर्जही भरले आहेत. विदर्भात भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही अर्ज दाखल केले आहेत. तर, दुसरीकडे महायुतीतील जागावाटप अंतिम टप्प्यात असून लवकरच चित्र स्पष्ट होईल. भाजापकडून शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध रितीने निवडणूक कार्यक्रम आणि जबाबदाऱ्यांचं वाटप केलं जात आहे. भाजपाकडून आता निवडणूक जाहीरनामा समितीची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रतील दोन नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे.
भाजपाने काही दिवसांपूर्वी देशातील आणि महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी भाजपाने घोषित केली. त्यानंतर, देशभरातील प्रभारी आणि सहप्रभारी नेतेही ठरवण्यात आले होते. त्यात, महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी प्रभारी व सहप्रभारीही ठरवण्यात आले. आता, भाजपाकडून जाहीरनामा समितीची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील दोन नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. केंद्रीयमंत्री पियुष गोयल आणि भाजपाचे सरचिटणी विनोद तावडे यांना स्थान मिळाले आहे. मात्र, भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीत असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या यादीत स्थान मिळाले नाही. त्यामुळे, अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकांना अतिशय गांभीर्याने घेतलं जात आहे. त्यामुळेच, एकेक जागेवरील उमेदवारासाठी सातत्याने चर्चा आणि सखोल मंथन होत आहे. आगामी निवडणुकांसाठी भाजपाने स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीयमंत्री रामदास आठवले, स्मृती इराणी यांच्यासह महाराष्ट्रातील महायुतीचे बडे नेते आहेत. तसेच, प्रभारी आणि सहप्रभारींची नावेही जाहीर केली आहेत. आता, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मान्यतेनुसार आगामी लोकसभा निवडणुकांसाठीचा जाहारीनामा करण्यात येणार आहे. त्यासाठी, २७ नेत्यांची समिती जाहीर करण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे या समितीचे अध्यक्ष असून अर्थमंत्री निर्मला सितारमण संयोजक आहेत. तर, पियुष गोयल हे सह-संयोजक आहेत. बाकी सर्वजण सदस्य म्हणून या समितीत कार्यरत आहेत.
भाजपाने निवडणूक जाहीरनामा समिती निश्चित केली असून ती प्रकाशितही केली आहे. त्यामुळे, आता भाजपाच्या जाहीरनाम्यातून सर्वसामान्य जनतेला काय मिळणार, भाजपाच्या जाहीरनाम्यात काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.