ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २५ - लोकसभा निवडणुकीदरम्यान मी बिहारबद्दल जी आश्वासने दिली ती नक्कीच पूर्ण करेन. तसेच योग्यवेळी बिहारसाठी पॅकेजची घोषणा करण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज बिहारच्या दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पाटण्यातील विकासकामांच्या उद्घाटनावेळी बोलत होते. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांचीही अखेर आज गाठ पडली. यावेळी मोदींनी नीतिश कुमार यांच्या कामाची स्तुतीही केली.
आज नरेंद्र मोदींच्या हस्ते दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजनेचा शुभारंभ, पाटणा आयआयटी व गॅस पाईपलाईनचे उद्घाटन करण्यात आले. तसेच पाटणा-मुंबई रेल्वेला हिरवा कंदील दाखवण्यात आला व दनियावा-बिहारशरीफ या नव्या रेल्वे मार्गाचे उद्घाटनही करण्यात आले.
देशाच्या विकासासाठी राज्यांचा विकास होणे गरजेचे अाहे, त्यासाठी गरिबी व बेरोजगारीवर विजय मिळवला पाहिजे. विकासासाठी केंद्र व राज्य सरकार दोघांनी मिळून काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. 'अटलजींचे सरकार असताना जी कामं सहा महिन्यात पूर्ण झाली असती ती आता २०१५ साल उजाडलं तरीही झालेली नाहीत. नितीश यांच्यानंतरच्या मधल्या काळात बिहारमधून आलेल्या इतर रेल्वे मंत्र्यांमुळेच हा विकास ठप्प राहिला, अशी टीका त्यांनी लालू प्रसाद यादव यांचे नाव न घेता केली. बिहार व पूर्वेकडील राज्यांचा विकास आमच्या प्राइन अजेंड्यावर असून त्यासाठी अनेक योजना विचाराधीन आहेत. बिहारमध्ये पायाभूत सुविधा सक्षम करण्याचे काम आम्ही करणार आहोत, असेही पंतप्रधान म्हणाले.