नवी दिल्ली : डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पेन्शनधारकांची नोंदणी सुरू करता यावी म्हणून आवश्यक तांत्रिक सहकार्य करण्याचे विविध राज्यांमधील राष्ट्रीय माहिती केंद्रांना (एनआयसी) सांगण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा त्रास न होता पेन्शनचे वाटप करता यावे, हा त्यामागचा हेतू आहे. अर्थात यामुळे कोट्यवधी पेन्शनधारकांची बँकेतील वार्षिक खेप वाचणार आहे.लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी पेन्शधारकांना दरवर्षी बँकेत जावे लागते. बँकेत जाण्याच्या या त्रासापासून मुक्ती मिळावी म्हणूक केंद्र सरकारने गेल्या वर्षी आधार कार्ड आधारित ‘जीवन प्रमाण’ ही बायोमेट्रिक सत्यापन पद्धत सुरू केली होती. या पद्धतीमुळे पेन्शनधारकांना पेन्शनचे वाटप करणाऱ्या बँकेत आॅनलाईन जीवन प्रमाणपत्र सादर करता येते. डिजिटल जीवन प्रमाणपत्रासाठी पेन्शनधारकांची नाव नोंदणी सुरू करण्यासाठी आवश्यक ते तांत्रिक सहकार्य करावे, असे डिपार्टमेंट आॅफ इलेक्ट्रॉनिक अॅण्ड इम्फॉर्मेशनतर्फे विविध राज्यांमधील एनआयसी केंद्रांना सांगण्यात आल्याची माहिती कार्मिक, लोक गाऱ्हाणी व पेन्शन मंत्रालयाच्या एका आदेशात देण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कोट्यवधी पेन्शनर्सची बँकेतील वार्षिक खेप वाचणार
By admin | Published: April 29, 2015 12:03 AM