लखनौ, दि. 22 - गुमनामी बाबा हे दुसरे तिसरे कुणी नसून सुभाष चंद्र बोस होते असं बहुतांश साक्षीदारांना वाटत होतं असं एका अहवालात समोर आलं आहे. निवृत्त न्यायाधीश विष्णू सहाय यांनी गुमनामी बाबांसंदर्भातला अहवाल उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांना सादर केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सहाय यांनी सांगितले की, त्यांच्या आयोगापुढे साक्ष देणाऱ्या बहुतांश साक्षीदारांना गुमनामी बाबा हे सुभाष चंद्र बोस वाटत होते.
गेल्या वर्षी जूनमध्ये समाजवादी पार्टीच्या सरकारने अलाहाबाद कोर्टाच्या आदेशावरून सहाय आगोग नेमला. गुमनामी बाबा हे सुभाष चंद्र बोस असल्याची जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. जे साक्षीदार स्वत:हून समोर आले आणि त्यांनी आयोगासमोर साक्ष दिली ते मुख्यत: माहितीचे स्त्रोत असल्याचे सहाय म्हणाले. या साक्षीदारांनी प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. त्या प्रतिज्ञापत्रांमधून साक्षीदारांची वक्तव्ये मिळाली आहेत. बहुतांश साक्षीदारांनी गुमनामी बाबा हेच नेताजी सुभाष चंद्र बोस होते किंवा असण्याची शक्यता आहे असं मत नोंदवलं आहे. अर्थात, काही जणांनी गुमनामी बाबा हे सुभाष चंद्र बोस नव्हते असंही मत नोंदवलं आहे.
सहाय यांनी एकूण 347 पानांचा अहवाल उत्तर प्रदेश सरकारकडे सादर केला आहे. त्यांनी अहवालाचा अंतिम निष्कर्ष मात्र सांगितला नाही. गुमनामी बाबांचा मृत्यू आणि आयोगानं केलेलं काम यांच्यामध्ये गेलेला काळ लक्षात घेतला तर हे आव्हानात्मक काम असल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे.
गुमनामी बाबा 1985 मध्ये मरण पावले. आणि साक्षीदारांनी दिलेल्या साक्षी 2016 - 17 या वर्षांमधल्या आहेत. काळाबरोबर स्मरणशक्ती अधू होते. तसंच कदाचित काही जणांनी काल्पनिक गोष्टी सांगितलेल्या असू शकतात असंही सहाय यांनी म्हटलं आहे.