मुबंई - 14 लोकांचे प्राण घेणाऱ्या मुंबई अग्नितांडव प्रकरणातील आरोपी आणि मोजोस बारचा सहमालक युग तुलीला हैदराबादमधून अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, पोलिसांकड़ून अद्याप अधिकृत माहीती देण्यात आलेली नाही. पोलीस प्रवक्ते दीपक देवराज यांनी युग तुलीला अटक झालेली नाही असे सांगितले आहे. मात्र तुली याच्या अटकेबाबत पोलीस दलात चर्चा सुरु आहे. त्यामुळे त्याच्या अटकेमागचे गुढ वाढ़तच आहे.
5 जनेवारी पर्यंत युग तुली पोलिसांच्या संपर्कामध्ये होता, पोलिसांना सहकार्य करत होता. पण अग्निशमन दलाच्या अहवालानंतर तो पसार झाला. पत्नीसोबत तो विमानाने पळून जाणार होता. पोलिसांना बघून त्याने विमानाने न जाता कारने हैदराबादला आजी अजोबांकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच महितीच्या आधारे पोलिसांनी हैदराबाद येथून त्याला ताब्यात घेतल्याचे समजते.
मुंबईच्या लोअर परेलमधील कमला मिल कंपाऊंडमधील मोजोस बारमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांनी प्राण गमावला होता. या अपघातानंतर हॉटेलने सुरक्षेकडे मोठ्या प्रमाणावर कानाडोळा केल्याने अपघात घडल्याचे समोर आले होते. पोलिस तपासात समोर आले आहे की, याठिकाणी कोणतीही परवानगी न घेता वाईन आणि हुक्का बार चालवला जात होता.
मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर तुली नागपूरहून हैदराबादला फरार झाला होता. हैदराबादमध्ये काहीदिवस आजीच्या घरी राहिल्यानंतर त्याने विमानाद्वारे फरार होण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. या दरम्यान मुंबई पोलिसांचे पथक तुलीला अटक करण्यासाठी हैदराबादेत दाखल झाले पण तुली पोलिसांच्या हाती आला नाही. कार घेऊन तो निघून गेला असल्याचे त्याच्या आजीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्याने अज्ञात स्थळी कार सोडली आणि तो कुठे गेला याबाबत काहीही माहिती मिळाली नाही. पोलिसांनी या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी जवळपास पथके तयार केली असल्याची माहिती मिळत आहे.