चीनमध्ये कोरोना महामारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. तेथील रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवरही वाईट परिणाम होताना दिसत आहे. यातच, जागतिक बँकेकडून चीनसाठी एक वाईट बातमी आली आहे. जागतिक बँकेने ड्रॅगनच्या विकास दरासंदर्भातील अंदाजात मोठी कपात केली आहे. तर, दुसरीकडे भारताबाबत रेटिंग एजन्सींचे मत सकारात्मक आहे. याशिवाय, कोरोनाचा उद्रेक आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी घालावे लागणारे कडक निर्बंध, यांचा परिणाम चीनमधील बिझनेस कॉन्फिडन्सवरही झाला आहे.
चिनी अर्थव्यवस्थेला धोका -कोरोनामुळे चीनची अर्थव्यवस्था कोलमडत चालली आहे. सर्व रेटिंग एजन्सींनी चीनचा विकास दरात पुन्हा एकदा बदल केला आहे. जागतिक बँकेने मंगळवारी एका अहवालात या वर्षासाठी चीनच्या विकास दराचा अंदाज कमी करून 2.7 टक्के केला आहे. यापूर्वी जून 2022 मध्ये जागतिक बँकेने चीनचा विकासदर 4.3 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. याच बरोबर, पुढील वर्षाच्या वाढीचा अंदाज 8.1 टक्क्यांवरून 4.3 टक्के करण्यात आला आहे.
बेरोजगारी दरही वाढला!अहवालानुसार चीनमधील बेरोजगारी दरही वाढला आहे. ऑक्टोबर महिन्यात तो 18 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात आयएमएफनेही चीनचा विकासदर कमी करण्याचे संकेत दिले होते. ऑक्टोबर 2022 मध्येच, IMF ने तो 3.2 टक्क्यांनी कमी केला आहे. जो 10 वर्षांतील सर्वात कमी आहे.
एकीकडे जागतिक बँक आणि आयएमएफसह अनेक रेटिंग एजन्सीज चीनच्या बाबतीत विकासदराचा आपला अंदाज पुन्हा एकदा बदलताना आणि तो कमी करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे, भारताच्या विकासदराच्या वेगावर विश्वास ठेवत आहेत. जागतिक रेटिंग एजन्सी फिचने मंगळवारीच भारताचे सॉवरेन रेटिंग स्थिर ठेवले आहे. तसेच रेटिंगला ‘BBB-’ वर कायम ठेवले आहे. याच बरोबर भारतातील गुंतवणुकीत तेजी येईल. फिचच्या अंदाजानुसार, मार्च 2023 मध्ये संपनाण्या आर्थिक वर्षात भारताचा GDP वृद्धिदर 7 टक्के राहील.