बंगळुरू - कर्नाटकच्या बिल्लारी येथील काँग्रेसआमदार आनंद सिंह यांनी आपल्या आमदारकीचाराजीनामा दिला आहे. आनंद यांनी आज विधानसभा सभापती के.आर. रमेशकुमार यांची भेट घेतली. त्यानंतर, मी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी हे अमेरिकेत असतानाच, सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
आनंद सिंह यांनी राज्यपालांकडेही आपला राजीनामा सोपवला आहे. मी सन्माननीय सभापती महोदयांकडे 1 जुलै 2019 रोजी माझ्या पदाचा राजीनामा सोपवला आहे. आपल्या माहितीस्तव मी हे पत्र लिहिले असून पुढील कार्यवाही लवकरात लवकर करावी, असे सिंग यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. माझ्या जिल्ह्यावर होत असलेल्या राजकीय अन्यायामुळे मी राजीनामा दिल्याचे आनंद सिंह यांनी सांगितले. मात्र, सभापती रमेशकुमार यांनी हे वृत्त फेटाळले आहे.
17 जून रोजी मी माझ्या मतदारसंघातील पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली होती. जिंदाल ग्रुपला सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या जागेला आमचा विरोध आहे. त्यासंदर्भात मी सरकारशी पत्रव्यवहारही केला होता. मात्र, माझ्या पत्राची कुठलिही दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे मी राजीनामा दिल्याचे आनंद यांनी म्हटले आहे. तसेच मी विजयनगर शहरास जिल्हा बनविण्याचीही मागणी केल्याचे सिंग यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले असून मी आनंद सिंह यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच सभापती महोदयांचीही भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. तर, 8 नोव्हेंबर रोजी कुमारस्वामी हे अमेरिकेहून कर्नाटकमध्ये परतणार आहेत.