नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारमधील वनमंत्री व प्रदेश भाजप मागासवर्ग सेलचे अध्यक्ष दारासिंह चौहान यांनी योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळातून बुधवारी राजीनामा देऊन निवडणुकीपूर्वी भाजपला आणखी एक धक्का दिला. मंगळवारीच स्वामी प्रसाद मौर्य यांनी सात आमदारांसह पक्षाचा राजीनामा दिला होता.
समाजवादी पार्टीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी अनेक आमदार भाजप सोडून सपामध्ये सहभागी होऊ शकतात. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी हे सर्व जण एकदम सपामध्ये जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आधी बसप, मग भाजप
सपाच्या तिकिटावर १९९६ मध्ये राज्यसभा खासदार झालेले दारासिंह चौहान २००५ मध्ये बसपात गेले होते. बसपाच्या तिकिटावर ते पूर्व उत्तर प्रदेशच्या घोसीमधून २००९ ची निवडणूक जिंकून लोकसभेत गेले होते, परंतु २०१४ च्या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यानंतर २०१६ मध्ये ते भाजपमध्ये गेले व त्यापुढील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुका जिंकून वनमंत्री झाले होते.
माेर्य यांच्याविराेधात अटक वॉरंट जारी
स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर अटक वॉरंट जारी केले. चिथावणीखोर भाषण दिल्याबद्दल ७ वर्षे जुन्या प्रकरणात आमदार-खासदारविषयक विशेष न्यायालयाने हे अटक वॉरंट बजावले आहे. वक्तव्य केले तेव्हा ते बसपामध्ये होते. २०१६मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणात त्यांच्या अटकेवर रोख लावली होती. आता सुलतानपूरच्या विशेष न्यायालयाने त्यांना २४ जानेवारी रोजी हजर होण्यासाठी वॉरंट जारी केले आहे.