नवी दिल्ली - कोरोना प्रादुर्भावामुळे NEET परीक्षेला हजर न राहता आलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यानुसार, विद्यार्थ्यांची परीक्षा 14 ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल. तर, देशातील नीट परीक्षेचा संपूर्ण निकाल 16 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे, कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेला बसता येणार आहे.
देशभरात 13 सप्टेंबर रोजी जवळपास 3,843 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटात 90 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. जवळपास 15.97 लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. लाखो विद्यार्थी निकालाची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) आज नीट 2020 चा निकाल आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन ntaneet.nic.in जाहीर करण्याची शक्यता होती. मात्र, आता हा निकाल 16 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्वकाही ठप्प होतं. मात्र, केंद्र सरकारने हळू हळू अनलॉक प्रक्रिया सुरू केल्यानंतर देशातील शिक्षण विभागातही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकीच एक निर्णय म्हणजे नीट परीक्षेचा होता. देशात, 13 सप्टेंबर रोजी नीट परीक्षा घेण्यात आली. मात्र, लाखो विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून वंचित राहावे लागले. आता, या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन आपले शैक्षणिक वर्ष वाया न घालवता, नीट मैदानात उतरणे फायदेशीर ठरेल.
शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी नीट परीक्षेच्या निकालाबाबत माहिती दिली होती. नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास उशीर होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेचा निकाल (NEET Exam Result 2020) हा 12 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाऊ शकतो. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्यॉरिटी पिन आवश्यक आहे. नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर एनटीए कॅटेगिरीनुसार कट ऑफ स्कोअर जाहीर केला जाणार आहे.