नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिन समारोहामध्ये यावेळी मोठे बदल करण्यात आले आहेत. यावर्षीपासून प्रजासत्ताक दिन सोहळा हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणजेच २३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील बदलांचा एक भाग म्हणून २९ जानेवारी रोजी होणाऱ्या बीटिंग द रिट्रीट सोहळ्यामध्ये वाजवण्यात येणाऱ्या सूरांच्या यादीतून अबाइड विद मी हे गीत हटवण्यात आले आहे. हे गीत महात्मा गांधींचे आवडते गीत होते.
अमर जवान ज्योती इंडिया गेट येथून हटवण्यावरून झालेला वाद ताजा असतानाच दिवसभराने ही बाब समोर आली आहे. भारतील लष्कराकडून बीटिंग द रिट्रीट सोहळ्याच्या प्रसिद्ध केलेल्या आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकामध्ये या ख्रिस्ती भजनाचा समावेश नाही आहे.
अबाइड विद मी हे गीत महात्मा गांधींची आवडती धून म्हणून ओळखले जाते. ही धून १९५० पासून सातत्याने बीटिंग रिट्रीट सोहळ्यामध्ये वाजवली जात आहे. मात्र ही धून सोहळ्यातून पहिल्यांदाच हटवण्यात आली असे नाही. २०२० मध्येही ही धून सोहळ्यामधून हटवण्यात आली होती. मात्र त्यावरून खूप वाद झाला होता. त्यामुळे २०२१ मध्ये या धूनचा पुन्हा समावेश करण्यात आला.
दरवर्षी २९ फेब्रुवारी रोजी बीटिंग द रिट्रीट सोहळ्याचे आयोजन केले जाते. हा सोहळा प्रजासत्ताक दिनाच्या समारोपाचे प्रतीक आहे. सूर्यास्तावेळी राजपथावर मिलिट्री बँड परफॉर्म करतात. यामध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे बँड्स सहभागी होतात.
गेल्या काही वर्षांमध्ये मिलिट्री बँडमध्ये भारतीय गीतांनी स्थान मिळवले आहे. आधी बँडमध्ये बहुतांश ब्रिटीश धून वाजवल्या जात असत. यावर्षी वाजवण्यात येणाऱ्या धुनमध्ये मिलिट्री गाण्यांबरोबरच लता मंगेशकर यांनी गायलेले ऐ मेरे वतन के लोगो हे गीत समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच सारे जहाँ से अच्छा हे गीतही शेवटची धून म्हणून वाजवली जाणार होती.