भोपाळ : मध्यप्रदेशातील बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्यात आणखी एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. व्यापमं घोटाळ्यातील दोन परीक्षांची चौकशी करीत असलेले सेवानिवृत्त आयएफएस अधिकारी विजय बहादूर यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी ओडिशाच्या झारसुगुडा येथील रेल्वे रुळावर आढळला.या घोटाळ्याशी संबंधित ५० लोकांचा आतापर्यंत संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) या प्रकरणाची चौकशी करीत आहे.या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार बहादूर हे पुरी-जोधपूर एक्स्प्रेसने पुरीहून भोपाळला परतत होते. ते १९७८ च्या आयएफएस तुकडीचे अधिकारी होते. यापूर्वी जानेवारी २०१२ मध्ये व्यापमं प्रकरणात अडकलेल्या नम्रता डामोर नामक वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा मृतदेह अशाच प्रकारे रेल्वे रुळावर सापडला होता. व्यापमं घोटाळ्याशी संबंधित लोकांचे मृत्यूसत्र सुरू झाल्यानंतर देशभर खळबळ माजली होती. चोहीकडून सरकारवर दबाव आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली. (वृत्तसंस्था)
व्यापमं घोटाळ्यात आणखी एक मृत्यू
By admin | Published: October 18, 2015 2:05 AM