देशात H3N2 इन्फ्लुएंझा व्हायरसचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. या व्हायरसमुळे गुजरातमध्ये राज्यातील पहिला मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वडोदरा येथील एका ५८ वर्षीय महिलेचा सयाजी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, ही महिला हायपरटेन्शनची रुग्ण होती. H3N2 व्हायरसच्या तपासणीसाठी नमुने पुण्यातील एका प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. स्वाइन फ्लू (H1N1) च्या म्यूटेटेड व्हायरसमुळे झालेला हा देशातील हा तिसरा मृत्यू आहे.
यापूर्वी, कर्नाटकात एक 82 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. संबंधित वृद्धाला इतरही काही आजार होते. तसेच, हरियाणामध्ये या व्हायरसमुळे 52 वर्षांच्या एका व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती लिव्हर कॅन्सरचा सामना करत होती.
वेगाने पसरतोय H3N2 इन्फ्लूएंझा -भारतात एच3एन2 इन्फ्लूएंझा व्हायरसचा (H3N2 Influenza Virus) संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे आणि संक्रमणही वेगाने वाढताना दिसत आहे. आयडीएसपी-आयएचआयपीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात 9 मार्चपर्यंत राज्यांतील एच3एन2 सह इन्फ्लुएंझाच्या विविध सब-व्हेरिअंटच्या एकूण 3038 एवढ्या रुग्ण संख्येची पुष्टी करण्यात आली होती. यात जानेवारी महिन्यातील 1245 रुग्णांचा, फेब्रुवारीतील 1307 रुग्णांचा आणि 9 मार्च पर्यंतच्या 486 रुग्णांचा समावेश आहे.
ही लक्षण दिसताच सावध व्हा - - H3N2 या व्हायरसच्या संसर्गात ताप, सर्दी, घसा खवखवणे, अंगदुखी, डोळ्यांत जळजळ व खोकला अशी लक्षणे दिसतात. - ताप दोन-तीन दिवसांत बरा होतो. पण, घशाचा त्रास थोडा जास्त काळ राहू शकतो. - एवढेच नाहीतर, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने इतरांनाही बाधा होऊ शकते.
आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले बचावात्मक उपाय -आरोग्य तज्ज्ञांनी लोकांना एच3एन2 इन्फ्लुएंझा व्हायरसपासून (H3N2 Influenza Virus) बचावाचे उपायही सांगितले आहेत आणि काही सल्लेही दिले आहेत. यात मास्कचा वापर करा. हाताची स्वच्छता पाळा आणि वेळोवेळी हात धुवा. याच बरोबर वर्षांतून एकदा फ्लूची लस टोचून घ्या असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.