लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत असलेले योगी सरकार हे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. गेल्या काही काळात उत्तर प्रदेशमधील काही शहरांची नावे बदलण्याचा योगी सरकारने घेतलेला निर्णय हा चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरला होता. दरम्यान, आता योगी सरकारमधील शिक्षण विभागाने चक्क काही प्रसिद्ध शायरांची नावेच बदलल्याने खळबळ उडाली आहे. मात्र यावरून टीका होऊ लागल्यानंतर नावांमध्ये दुरुस्ती करण्यात येईल, असे स्पष्टीकरण विभागाकडून देण्यात आले आहे.
काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद शहराचे नामांतर प्रयागराज करण्यात आले होते. त्यावरून उत्तर प्रदेश सरकारमधील शिक्षण विभागाने प्रसिद्ध शायर अकबर इलाहाबादी यांचं नाव बदलून अकबर प्रयागराजी असे केले. एवढ्यावरच न थांबता तेग इलाहाबादी आणि राशिद इलाहाबादी यांचीही नावे बदलून तेग प्रयागराजी आणि राशिद प्रयागराजी अशी करण्यात आली. आयोगाने ही नावे बदलल्यानंतर या निर्णयावर चौफेर टीका होऊ लागली. दरम्यान, उच्च शिक्षा सेवा आयोगाचे अध्यक्ष ईश्वर शरण विश्वकर्मा यांनी या प्रकाराबाबत त्यांना काही कल्पना नसल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, उच्चतर शिक्षण सेवा आयोगाने केलेल्या या या नामांतरावर साहित्य जगतातून चौफेर टीका केली जात आहे. सोशल मीडियावर आयोगाचे हे पेज शेअर केले जात आहे. प्रसिद्ध लेखक राजेंद्र कुमार यांनीही उच्च शिक्षण आयोगाने केलेला हा बदल मूर्खपणाचा असल्याची टीका केली आहे. कुणी साहित्यिक त्याच्या नावासमोर इलाहाबादी लिहित असेल तर ती त्याची ओळख झाली ती बदलता कशी येईल, हा तर इतिहास पुसण्याचा प्रकार आहे, आयोगाने ही चूक तात्काळ सुधारली पाहिजे.
प्रसिद्ध शायर श्लेष गौतम यांनी सांगितले की, अकबर इलाहाबादी यांना अकबर प्रयागराजी लिहिणे चुकीचे आहे. अकबर इलाहाबादी हीच त्यांची ओळख आहे. शहराचे अलाहाबाद हे नाव बदलून प्रयागराज करण्यात आले असले तरी तुम्ही एवढ्या मोठ्या शायराच्या नावात बदल कसा काय करता येईल, हे चुकीचे आहे आणि निंदनीय आहे.