आणखी एक हिरे व्यापारी बँकांना बुडवून पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 06:49 AM2018-03-02T06:49:57+5:302018-03-02T06:49:57+5:30
नीरव मोदी, मेहुल चोकसी, द्वारकादास सेठ यांच्या घोटाळ्यानंतर आता यात आणखी नवीन नाव जोडले गेले आहे.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : नीरव मोदी, मेहुल चोकसी, द्वारकादास सेठ यांच्या घोटाळ्यानंतर आता यात आणखी नवीन नाव जोडले गेले आहे. हे नाव आहे प्रख्यात हिरे व्यापारी जतीन मेहता यांचे. जतीन मेहता यांच्यावरही बँकांची फसवणूक करून ६,७१२ कोटींचा कथित घोटाळा केल्याचा आरोप आहे. काँग्रेसने केंद्र सरकारकडे याबाबतचा खुलासा मागितला आहे.
काँग्रेस नेते शक्तिसिंह गोहिल आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांनी या कथित घोटाळ्यासंबंधी कागदपत्रे जनतेसमोर ठेवली आहेत. यात त्यांनी म्हटले आहे की, फेब्रुवारी २०१४ मध्ये मुंबईतील सीबीआय कार्यालय आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे जतीन मेहता यांच्या विनसम कंपनीविरोधात तक्रार करण्यात आली होती. यात बँकांची मोठी फसवणूक केल्याचा आरोप करीत या संदर्भातील पुरावेही सादर केले होते. परंतु सीबीआय तसेच मोदी सरकारने यावर काहीही कारवाई केली नाही. पुढे साडे तीन वर्षे शांत बसल्यानंतर सीबीआयने ५ एप्रिल २०१७ कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ४ एप्रिल २०१७ रोजी तक्रारकर्त्याने दिलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने ही तत्परता दाखविली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या काळात मोदी सरकार शांत बसले होते, तपास यंत्रणाही डोळे बंद करून बसल्या होत्या, तिकडे जतीन मेहता आणि त्याची पत्नी सहजपणे भारतातून पळून गेले, इतकेच काय त्यांनी भारताचे नागरिकत्वही सोडून दिले.
हाती आलेल्या माहितीनुसार जतीन मेहता आणि त्याची पत्नी सध्या टॅक्सचोरीसाठी नंदनवन मानले जाणाºया सेंट किट्समध्ये रहात आहेत. त्यांनी हा देश निवडला कारण भारताने सेंट किट्ससोबत प्रत्यार्पण करार केलेला नाही.
नीरव मोदी, मेहुल चोकसी यांच्याप्रमाणे जतीन मेहताही बँकांची फसवणूक करून भारतातून पळून गेला आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. याबाबत पंतप्रधानांनी बाळगलेल्या मौनाबद्दल काँग्रेसने टीका केली आहे. ‘चौकीदार झोपला आहे का, त्याचा आवाज का निघत नाही, तो शांत का बसला आहे’, असा जाब काँग्रेसने विचारला आहे.
काँग्रेसचे मोदींना प्रश्न
सीबीआयने तात्काळ गुन्हा का दाखल केला नाही?
साडेतीन वर्षांनंतर गुन्हा का दाखल केला?
ईडी, ईओडब्ल्यू आणि मंत्रालयाने साडेतीन वर्षे कारवाई का नाही केली?
हे सगळे शांत बसण्यामागचे रहस्य काय?