आणखी एका हत्तिणीचा मृत्यू, फळांमधून फटाके तोंडात गेल्याने जबड्यांना फ्रॅक्चर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 04:28 AM2020-06-07T04:28:03+5:302020-06-07T04:28:14+5:30
केरळ : फळांमधून फटाके तोंडात गेल्याने जबड्यांना फॅ्रक्चर
तिरुवनंतपूरम : केरळात एका गर्भवती हत्तिणीचा अननसातील स्फोटकांमुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आणि त्यावरून देशात संतापाची लाट उसळलेली असतानाच या राज्यात आणखी एका हत्तीच्या मृत्यूचे प्रकरण उजेडात आले आहे. कोल्लम जिल्ह्यात एप्रिलमध्ये एका तरुण हत्तिणीचा मृत्यू झाला. जबड्याला फ्रॅक्चर झाल्यानेच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी याला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, रासायनिक विश्लेषण अहवाल अद्याप बाकी आहे. हे फटाक्यांमुळेच झाले असावे असा आम्हाला संशय आहे.
पठाणपूरमच्या जंगलात ही हत्तीण अतिशय थकलेल्या अवस्थेत दिसून आली होती. या अधिकाºयाने सांगितले की, आम्ही तिला काही औषधे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती काही अंतरापर्यंत गेली आणि दुसºया दिवशी कोसळली. दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले की, यात दोषी आढळणाºयाविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोत ही हत्तीण नदीच्या पाण्यात उभी असलेली दिसते. सोंड पाण्यात बुडवून त्रासापासून सुटका करण्याच्या प्रयत्नात ही हत्तीण दिसते. त्यानंतर त्याच ठिकाणी या हत्तिणीचा मृत्यू झाला.
वन अधिकारी आशिक अली यांनी सांगितले की, ही घटना नेमकी कधी झाली, ते सांगता येणार नाही; पण २० दिवसांपूर्वी झाली असावी. उपासमारीने कदाचित तिचा मृत्यू झाला असावा.
...आणि हत्तिणीने जलसमाधी घेतली
वन अधिकारी मोहन कृष्णन म्हणाले की, आम्ही पाहिले तेव्हा ही हत्तीण नदीच्या पाण्यात होती. तिचे तोंड पाण्यात बुडालेले होते. तिला ज्ञानेंद्रियातून जाणीव झाली असावी की, आपला मृत्यू होणार आहे. त्यामुळे तिने नदीत जलसमाधी घेतली. वन अधिकाऱ्यांचे असेही म्हणणे आहे की, जंगली डुकरांपासून शेती वाचविण्यासाठी स्थानिक लोक अननस किंवा अन्य फळांमध्ये फटाके भरून ठेवतात. असेच फळ खाल्ल्याने या हत्तिणीचा मृत्यू झाला असावा, असाही अंदाज आहे.
स्फोटकांमुळे गायीचा जबडा फाटला
विलासपूर : हिमाचल प्रदेशात अशीच एक घटना समोर आली आहे. विलासपूरमध्ये एका गर्भवती गायीला अज्ञात व्यक्तीने स्फोटके खायला दिल्याने या गायीचा जबडा फाटला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना झंडुता भागात घडली. ही गाय एका शेतात चरत असताना या गायीच्या तोंडात स्फोट झाला आणि तिचा जबडा फाटला.