हैदराबाद : गेल्या १३ दिवसांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षा व्यवस्थेत दुसऱ्यांदा त्रुटी आढळून आली आहे. हैदराबादच्या दौऱ्यावर असलेल्या अमित शहा यांच्या ताफ्यासमोर शनिवारी अचानक तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते गोसुला श्रीनिवास यांची गाडी येऊन उभी राहिली व शहा यांच्या सुरक्षा जवानांची ती गाडी हटविताना तारांबळ उडाली.
काही दिवसांपूर्वी अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आले होेते. त्यावेळी ५ सप्टेंबरला एक जण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ घुटमळत होता. त्याने अमित शहा यांच्याजवळ जाण्याचाही प्रयत्न केला. हैदराबादमध्ये शनिवारी अमित शहा यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते गोसुला श्रीनिवास यांची गाडी अचानक येऊन उभी राहिली. या घटनेने शहांचे सुरक्षारक्षक काही क्षण गोंधळले. मग त्यांनी लगेच ही गाडी तेथून हटवली. आपल्या गाडीची मागची काच शहा यांच्या सुरक्षा रक्षकांनी फोडल्याचा आरोप गोसुला श्रीनिवास यांनी केला.
‘अनेकांनी आश्वासन पाळले नाही’हैदराबाद मुक्तीदिन साजरा करण्याचे दिलेले आश्वासन अनेकांनी व्होट बँकेच्या राजकारणापायी व रझाकारांच्या भीतीमुळे पाळले नाही, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. या दिनानिमित्त शनिवारी आयोजिलेल्या कार्यक्रमासाठी अमित शहा हैदराबाद येथे आले होते. हैदराबाद मुक्त करण्याचे सारे श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांचे आहे. त्यांनी कठोर निर्णय घेतला नसता तर हैदराबादला मुक्त करण्यासाठी आणखी काही वर्षे लागली असती, असेही अमित शहा यांनी सांगितले.