नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) २२ मे रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून राडार इमेजिंग सॅटेलाईट (रिसॅट-२ बीआरवन) अवकाशात सोडणार असल्यामुळे भारताला अवकाशात नजर ठेवण्यासाठी आणखी एक डोळा लाभणार आहे.यापूर्वीच्या रिसॅट मालिकेतील उपग्रहांच्या तुलनेत रिसॅट-२ बीआर वन हा खूपच अत्याधुनिक आहे. नवा उपग्रह हा बाहेरून जुन्या उपग्रहासारखाच दिसतो; परंतु आधी अवकाशात सोडण्यात आलेल्या उपग्रहापेक्षा याचे कॉन्फिग्युरेशन वेगळे आहे. नव्या उपग्रहाची टेहळणी व इमेजिंग क्षमता ही वाढलेली आहे. रिसॅटच्या एक्स बँड सिनेथिक अपर्चर राडारची (एसएआर) क्षमता दिवस-रात्र तसेच सर्व हवामानात लक्ष ठेवण्याची आहे. राडार ढगात शिरू शकते व एक रिझोल्युशन एक मीटरपर्यंत झूम करू शकते. रिसॅट उपग्रह पृथ्वीवरील इमारत किंवा वस्तूचे छायाचित्र दिवसातून दोन ते तीन वेळा घेऊ शकते. त्यामुळे हा उपग्रह पाकव्याप्त काश्मीरमधील जिहादी दहशतवादी तळ आणि नियंत्रण रेषेवरील दहशतवाद्यांच्या लाँचिंग पॅड्सवरून होणाऱ्या घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी मदत करील.यापूर्वीच्या रिसॅट मालिकेतील उपग्रहांनी घेतलेल्या इमेजेसचा (प्रतिमा) उपयोग २०१६ मध्ये केल्या गेलेल्या सर्जिकल स्ट्राईक्ससाठी आणि यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानातील बालाकोटमध्ये जैश-ए-महंमदच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांसाठी केला गेला आहे.काय आहे रिसॅट-२?या नव्या इमेजिंग सॅटेलाईटमुळे सर्व प्रकारच्या हवामानात भारतीय सुरक्षा दलांच्या टेहळणी क्षमतेला वाढवेल आणि भारतीय सीमांवर कोणत्याही प्रकारच्या संभाव्य धोक्याला शोधून काढेल.हा उपग्रह समुद्रातील शत्रू देशांच्या जहाजांना शोधेल व हिंद महासागरात चीनच्या नौदलाच्या जहाजांवर तसेच अरेबियन समुद्रात पाकिस्तानी युद्ध नौकांवर ससाण्यासारखी नजर ठेवेल.
अवकाशात लक्ष ठेवण्यास आणखी एक डोळा, इस्रो करणार २२ मे रोजी प्रक्षेपण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 5:33 AM