नवी दिल्ली - दिल्लीतील केजरीवाल सरकारने नागरिकांना मोठी भेट दिली आहे. नागरिकांकडे असलेल्या पाणी बीलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. ज्या नागरिकांच्या घरी फंक्शनल मीटर आहे, त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. तसेच, उर्वरीत नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत फंक्शनल मीटर बसवून घेण्याची सवलतही दिल्ली सरकारने दिली आहे.
नवीन तंत्रज्ञामुळे जुन्या बिलांसंदर्भातील अनेक अडचणी समोर आल्या आहेत. विना रिडींगही नागरिकांना बील आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. लोकांच्या पाण्याची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकूण 23.73 लाख उपभक्ता नागरिकांपैकी 13.5 लाख नागरिकांची थकबाकी शिल्लक आहे. त्यामध्ये घरगुती जोडणी असलेल्यांचे 2500 कोटी रुपये तर कमर्शियल जोडणी असलेल्यांची 1500 कोटी रुपये थकबाकी आहे. दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास 600 कोटी रुपये जल बोर्डला मिळणार आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केजरीवाल यांनी दिल्लीतील नागरिकांचे वीज बील माफ केले होते. 200 युनिट वीज वापणाऱ्या नागरिकांचे लाईट बील माफ करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला होता. त्यानंतर, आता पाणी बीलची थकबाकीही माफ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केजरीवाल सरकारकडून हे निर्णय घेण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.