लखनऊ- शहरात एका स्वयंघोषित अध्यात्मिक गुरूला सितापूर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. एका 21 वर्षीय तरूणीला कैद करून तिच्यावर तब्बल आठ महिने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. शेजारील जिल्ह्यात असणाऱ्या एका डिग्री कॉलेजमध्ये या मुलीला कैद करून तिच्यावर आठ महिने बलात्कार करण्यात आला. या बाबाच्या गुन्ह्याला प्रोत्साहन दिल्याचा आरोप ठेवून पोलिसांनी त्यांच्या काही महिला अनुयायांवरही गुन्हा दाखल केला आहे.
बाबा सियाराम दास (वय 60 वर्ष) असं या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरूचं नाव असून तो तेथिल काही शैक्षणिक संस्था चालवतो. यामध्ये काही डीग्री कॉलेजचाही समावेश आहे. लखनऊ, बाराबंकी, आग्रा आणि हाथरस जिल्ह्यातील काही भागात बाबा सियाराम दासच्या नावे काही संपत्ती असल्याचंही समोर आलं आहे. पीडित मुलीचा चुलत भाऊ अनोखे आणि इतर दोन जणांनी बाबाचा अनुयायी आणि श्री चंद्रा भगवान इंटर कॉलेजचा व्यवस्थापक असलेल्या रिंटू सिंग याच्याशी एका प्रॉपर्टीचा करार केला होता, अशी माहिती पीडित तरूणीने दिली. रिंटूने गेल्या वर्षी पीडित तरूणीची बाबा सितारामशी ओळख करून दिली होती. तरूणीच्या तक्रारीनुसार, तिचा चुलत भाऊ रियाराम आणि रिंटूकडून पैसे घेऊन फरार झाला आहे.
बाबा सियारामने मुलीला कैदेत ठेवलं होत आणि त्याच्या अनुयायांना तिच्यावर नजर ठेवायलाही सांगितलं. कैदेत असताना माझा खूप छळ झाला. तेथिल अनेक लोकांनी माझा गैरफायदा घेतल्याचं पीडित तरूणीने माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर सांगितलं आहे. पीडित तरूणी पोलीस कंट्रोल रूममध्ये सोमवारी उशिरा फोन केल्याने हा संपूर्ण प्रकार उजेडात आला. पोलीस अधिकारी अशोक कुमार सिंग यांनी बाबा सियारामचा आग्र्यामध्ये शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं आहे. हा बाबा आग्र्यात प्रॉपर्टीचा वाद मिटविण्यासाठी गेला होता.
दरम्यान, स्वयंघोषित अध्यात्मिक गुरूबद्दलचा एक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला जाणार आहे. तसंच सियाराम यांच्या यांच्या मालमत्तेची तपासणी होणार असून सीतापूरमधील मालकीच्या मालमत्तांचेतीही तपासणी केली जाणार आहे. कॉलेजमध्ये सियारामच्या असलेल्या बेडरूममधून पोलिसांनी काही कपडे ताब्यात घेतले आहेत. तसंच रिंटू आणि पीडित तरूणीच्या चुलत भावाचा शोध घेतला जातो आहे.