Crime News : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय नागरिकांच्या परदेशात हत्या करण्यात येत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अशातच आता एका भारतीय विद्यार्थिनीचा अमेरिकेत मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात एका २५ वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे तरुणीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली.
फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारी तेलंगणाच्या गुंटीपल्ली सौम्याला २७ मे रोजी रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने धडक दिली होती. गुंटीपल्ली सौम्या ही तेलंगणातील भुवनगिरी जिल्ह्यातील रहिवासी होती. अमेरिकेतील फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती तिथेच राहात होती. नेहमीप्रमाणे सौम्या २७ मे रोजी रात्री घरासाठी काही वस्तू घेण्यासाठी बाजारात गेली होती. मात्र घरी परतत असताना रस्ता ओलांडताना भरधाव कारने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने तिच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे. सौम्याचा मृतदेह तेलंगणात आणण्यासाठी पालकांनी सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
सौम्या ही तेलंगणातील यदाद्री-भोंगीर जिल्ह्यातील यादग्रीपल्ले गावची रहिवासी होती. तिचे वडील कोटेश्वर राव हे आधी सीआरपीएफ जवान होते आणि आता जनरल स्टोअर चालवतात. GoFundMe वेबसाइटनुसार, सौम्याच्या शिक्षणासाठी पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. त्यानंतर सौम्या दोन वर्षांपूर्वी अभ्यासासाठी अमेरिकेला गेली होती. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती नोकरीच्या शोधात होती. त्यामुळे ती तिथेच थांबली होती. मात्र रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, तेलंगणाचे मंत्री कोमातिरेड्डी व्यंकट रेड्डी यांनी कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे. सौम्याचे पार्थिव परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या प्रकरणात अद्याप आरोपीला अटक केल्याची कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. दुसरीकडे, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये फ्लोरिडामध्ये अशाच अपघातात जान्हवी कंदुला या भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. त्या अपघातात भारतीय विद्यार्थ्याला पोलिसांच्या वाहनाने धडक दिली होती. अपघाताच्या व्हिडीओमध्ये पोलीस हसताना दिसत होते.