श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात बुधवारी झालेल्या संघर्षात आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या ६६ वर पोहोचली आहे, तर काश्मिरातील सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री राजनाथ सिंह हे दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर दाखल झाले आहेत. आमीर बशीर या तरुणाला या आंदोलनादरम्यान छातीत गोळी लागली. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच तो मरण पावला. सुरक्षा दल आणि आंदोलक यांच्यात सकाळी हा संघर्ष झाला. या आंदोलनात काही आंदोलक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अनंतनाग जिल्ह्यात कोकेरनाग भागात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत हिज्बुलचा अतिरेकी बुरहान वानी हा मारला गेल्यानंतर, ९ जुलैपासून काश्मिरात हिंसाचार उसळला आहे. यात आठ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सलग ४७ व्या दिवशी काही भागांत संचारबंदी आहे. श्रीनगरच्या पाच पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात संचारबंदी आहे. याशिवाय बटमालू आणि मैसुमा भागात व अनंतनाग शहरातही संचारबंदी आहे. (वृत्तसंस्था)>राजनाथसिंहांचे आवाहनगृहमंत्री राजनाथसिंह हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी बुधवारी येथे दाखल झाले असून, ‘इन्सानियत, जम्हुरियत आणि काश्मिरियत’ (मानवता, लोकशाही आणि काश्मीर) यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी चर्चेसाठी यावे, असे आवाहनच त्यांनी केले. विविध पक्ष, संघटनांशी आपण चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काश्मीर हिंसाचारात आणखी एक ठार
By admin | Published: August 25, 2016 4:56 AM