काँग्रेसने महाराष्ट्रात आत्तापर्यत १२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस राज्यात लोकसभेची निवडणूक लढवत आहे. त्यात, १२ जणांना तिकीट दिलं असून अद्यापही काही जागांवर काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातच, आज काँग्रेसची आणखी एक उमेदवार यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये, कर्नाटक आणि राजस्थान या दोन राज्यातील एकूण ५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यापैकी, २ उमेदवारांची अदलाबदलीही करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता उमेदवारांच्या अर्जाची छाननी होऊन अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भातील मतदान होत आहे. त्यामुळे, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विदर्भातील उमेदवारांच्या नावांची सर्वप्रथम घोषणा केली. अद्यापही मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही उमेदवारांची घोषणा बाकी आहे. त्यातच, काँग्रेसने आज आणखी एक उमेदवारांची यादी जाहीर केली असून ५ उमेदवारांना तिकीट देऊ केलं आहे.
काँग्रेसने राजस्थान आणि कर्नाटकमधील उमेदवारांची ही यादी जाहीर केली. त्यात, राजस्थानमधील राजसमंद आणि भिलवाडा मतदारसंघातील उमेदवार बदलले आहेत. राजसमंदमधून काँग्रेसने सुदर्शन रावत यांच्या जागी डॉ.दामोदर गुर्जर यांना तिकीट दिले आहे. याआधी काँग्रेसने भीलवाडा मतदारसंघातून दामोदर गुर्जर यांना लोकसभेचे तिकीट दिले होते. मात्र नव्या यादीत दामोदर गुर्जर यांची जागा बदलण्यात आली आहे. आता त्यांना राजसमंद येथून तिकीट देण्यात आले आहे. त्यांच्या जागी भिलवाडामधून सीपी जोशी यांना तिकीट देण्यात आले आहे.
दरम्यान, कर्नाटकमधून तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. बेल्लारी, चमराज नगर आणि चिक्क बल्लापूर या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा या यादीत करण्यात आली आहे.