उज्जैन - उज्जैनमधील प्रसिद्ध महाकाल मंदिराच्या परिसरात बांधकामासाठी खोदकाम सुरू आहे. या खोदकामादरम्यान जमिनीखालून काही अनमोल वस्तू समोर आल्या आहेत. या खोदकामादरम्यान, काही प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत. तसेच महाकाल मंदिराच्या जमिनीखाली काही जुन्या भिंतीही दिसून आल्या आहेत. या खोदामामध्ये अजून काही ऐतिहासिक वस्तू मिळू शकतात, असा पुरातत्व विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, खोदकामात सापडलेल्या मूर्ती ११व्या आणि १२व्या शतकादरम्यानच्या आहेत. खोदकामादरम्यान, अशा वस्तू पाहून तज्ज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Another Mandir found under the Mahakal Mandir in Ujjain, ancient idols found in excavations)
पुरातत्त्व संशोधकांच्या चार सदस्यीय पथकाने खोदकामाच्या ठिकाणाचा दौरा केला आहे. येथे सापडलेले अवशेष हे शुंग वंशाच्या राजवटीतील असावेत, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. महाकाल मंदिराचा विस्तार करण्यासाठी मंदिराच्या आवारात खोदकाम सुरू आहे. यादरम्यान येथे एक प्राचीन मूर्ती सापडली. दोन दिवसांनी पुरातत्त्ववेत्यांचे एक पथक मंदिराच्या परिसरात दाखल झाले. या अवशेषांची माहिती सांस्कृतिक मंत्रालयाला देण्यात आली आहे. राज्य पुरातत्व विभागाला हे अवशेष पाहण्याची विनंती करण्यात आली आहे.
पुरातत्व विभागाकडून डॉ. रमेश यादव, डॉ. ध्रुवेंद्र सिंह जोधा, सर्वेक्षक योगेश पाल आमि पुरातत्वतज्ज्ञ डॉक्टर रमेश कुमार यांच्या पथकाने मंदिराच्या विविध भागांचा दौरा केला. मंदिराच्या उत्तर आणि दक्षिण भागात नवे अवशेष सापडले आहेत.
डॉ. रमेश यादव यांनी सांगितले की, महाकालेश्वर मंदिराच्या खाली ११व्या आणि १२व्या शतकातील मंदिर दबलेले असल्याची शक्यता आङे. आम्ही मंदिराच्या आवारात अनेक अवशेष पाहिले आहेत. त्यामध्ये खांब, मंदिराच्या कळसाचा भाग, नक्षिकाम केलेले दगडी रथ यांचा समावेश आहे. यापैकी अनेक अवशेष हे उत्तर भागात आहेत.
डॉ. यादव यांनी सांगितले की, पुरातत्ववाद्यांना मंदिराच्या अस्तित्वाचा संकेत देणारे काही भागही सापडले आहेत. मंदिराच्या दक्षिण भागात जमिनीखाली चार मीटर खाली आम्हाला एका भिंतीचे अवशेष सापडले आहे. ते शुंग काळाशी संबंधित असल्याचे दिसत आहे. यापूर्वीही असे अन्य अवशेष मिळाले आहेत. त्यामुळे हे मंदीर शुंगकाळातही अस्तित्वात होते असे दिसून येते.
२०२० मध्येही मंदिराच्या परिसरात केलेल्या खोदकामामध्ये काही अवशेष सापडले होते. तर पुरातत्व शास्त्रज्ञ रमेश यादव यांनी सांगितले की, याबाबत लवकरच एक विस्तृत अहवाल तयार करण्यात येईल. हा अहवाल आम्ही संस्कृती मंत्रालयाला सोपवू.