नवी दिल्ली-
एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये २६ नोव्हेंबरच्या धक्कादायक घटनेच्या दहा दिवसांनंतर आता पॅरिस-दिल्ली सेक्टरमध्येही पुन्हा तोच किळसवाणा प्रकार घडला आहे. एका मद्यधुंद पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केल्याची घटना उघडकीस आली आहे. पण प्रवाशाने लेखी माफीनामा दिल्यामुळे संबंधित प्रवाशावर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
एअर इंडियाच्या फ्लाइट १४२ मध्ये ही घटना ६ डिसेंबर रोजी घडली होती अशी माहिती समोर आली आहे. विमानाच्या पायलटने या प्रकरणाची माहिती इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला दिली, त्यानंतर त्या पुरुष प्रवाशाला अटक करण्यात आली होती. दरम्यान प्रवासी नेमका कोणत्या क्लासमधून प्रवास करत होता याची माहिती कळू शकलेली नाही.
सकाळी ९:४० च्या सुमारास संबंधित फ्लाइट दिल्ली विमानतळावर उतरले आणि सुरक्षेला व्यवस्थेला घटनेची माहिती देण्यात आली होती. "एक पुरुष प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होता आणि तो केबिन क्रूच्या सूचनांचं पालन करत नव्हता. त्यानं ऑनबोर्ड महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली", अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. आरोपी प्रवासी विमानातून उतरताच त्याला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांनी पकडलं, परंतु नंतर दोन प्रवाशांनी "परस्पर तडजोड" झाल्यानंतर आणि आरोपीनं लेखी मागितल्यानंतर त्याला सोडण्यात आले.
महिला प्रवाशाने सुरुवातीला लेखी तक्रार केली होती पण नंतर तिनं पोलीस केस दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी प्रवाशाला इमिग्रेशन आणि कस्टम औपचारिकता पूर्ण केल्यावर विमानतळाच्या सुरक्षेने जाण्याची परवानगी दिली. ही घटना २६ नोव्हेंबरच्या घटनेच्या एका आठवड्यानंतर समोर आली आहे. याआधीही एका पुरुष प्रवाशाने न्यूयॉर्क-दिल्ली एअर इंडियाच्या विमानात एका महिला सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप आहे.
२६ नोव्हेंबर रोजीच्या घटनेत पीडित प्रवाशाने एअर इंडियाकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आणि आरोपीला पकडण्यासाठी अनेक पथकं तयार केली आहेत.
आरोपी प्रवाशावर ३० दिवसांची बंदीएअर इंडियाने २८ डिसेंबर रोजी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले की, न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमान दिल्लीला येत होते. यावेळी एका प्रवाशाने दारुच्या नशेत बिझनेस क्लासमध्ये बसलेल्या एका वृद्ध महिलेवर लघवी केली. या घटनेनंतर, एअर इंडियाने एक अंतर्गत समिती स्थापन केली आणि त्यांनी आरोपी प्रवाशाला नो-फ्लाय लिस्टमध्ये ठेवण्याची शिफारस केली. तसेच, प्रवाशाला 30 दिवस प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दोषी आढळल्यास पुढील कारवाई केली जाईल.