नवी दिल्ली - सीमेवर सातत्याने भारतीय लष्करासमोर अपयशी ठरणा-या पाकिस्तानने पुन्हा एकदा घुसखोरीचा मोठा कट आखला आहे. पाकिस्तानी लष्कर आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने एक स्पेशल ऑपरेशन टीम बनवली आहे. या टीममध्ये 386 दहशतवादी असून या सर्वांना पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. इंडिया टुडेला मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व दहशतवादी काश्मीर खो-यात घुसखोरीच्या प्रतिक्षेत आहेत.
पीओकेमध्ये पाकिस्तानने 13 नवीन लाँच पॅड उभारले असून सध्या हे सर्व दहशतवादी तिथे आहेत. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या वरिष्ठ फळीची एक बैठक झाली. त्या बैठकीत दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंडिया टुडेच्या हाती जी कागदपत्र लागली आहेत त्यात हे लाँच पॅड कुठे आहेत त्याची सुद्धा माहिती आहे.
केल, सर्दी, जुरा, लिपा, पाच्चीबान, काठुआ, कोटली, मानधर, निकाली, चमनकोट, जनको, दुधनिअल, अॅथमकम या भागात हे लाँच पॅड आहेत. प्रत्येक लाँच पॅडमध्ये किती दहशतवादी आहेत त्याची माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांनी मिळवली आहे. 77 दहशतवादी घुसखोरीच्या प्रतिक्षेत आहेत.
या दहशतवाद्यांना अमेरिकन आणि चिनी शस्त्रास्त्रे कशी चालवायची त्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पाकिस्तानी लष्करातील आयटी तज्ञांनी या दहशतवाद्यांना टेहळणी उपकरणे हाताळण्याचे आणि जीपीएस कसे वापरायचे त्याचे प्रशिक्षण सुद्धा दिले आहे. आयएसआयने लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांना भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांना टार्गेट करण्याचे आदेश दिले आहेत.