नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस उरले आहेत. दरम्यान, बिहारमधील विधानसभेचा संभाव्य कल दाखवणारे ओपिनियन पोल प्रसिद्ध होऊ लागले आहेत. दरम्यान, काल प्रसिद्ध झालेल्या एबीपी न्यूज-सी वोटरच्या ओपिनियन पोलमध्येही बिहारमध्ये नितीशराज कायम राहण्याचा कल समोर आला आहे. तर राजद आणि काँग्रेसच्या महाआघाडीला पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागण्याची शक्यता या ओपिनियन पोलमध्ये वर्तवली आहे.एबीपी न्यूज - सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पोलनुसार नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला १३५ ते १५९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाआघाडीला ७७ ते ९८ जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीएपासून वेगळे होत स्वबळावर निवडणूक लढवत असलेल्या चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला कुठलाही फायदा होताना दिसत नसून, त्यांच्या पक्षाला केवळ १ ते ५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांच्या खात्यात ४ ते ८ जागा जाऊ शकतात.मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास बिहारमधील एकूण २४३ जागांपैकी एनडीएला ४३ टक्के तर महाआघाडीला ३५ टक्के मते मिळू शकतात. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीच्या खात्यात ४ टक्के मते जाण्याची शक्यता आहे. तर १८ टक्के मतदान इतरांच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे.प्रत्येक पक्षाच्या जागांचा विचार केल्यास या ओपिनियन पोलनुसार भाजपाला सर्वाधिक ७७ जागा मिळण्याची शक्यता आहे. जेडीयूला मोठा प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असून, जेडीयूला ६३ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. आरजेडीला ६० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १६ जागा मिळण्याची शक्यता आहे.बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबर रोजी, दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबर रोजी आणि तिसऱ्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर होईल.
opinion poll : अजून एका ओपिनियन पोलचा नितीश कुमार आणि एनडीएकडे कल, तेजस्वी यादव सत्तेपासून दूरच
By बाळकृष्ण परब | Published: October 25, 2020 7:40 AM