अमृतसर : अमली पदार्थ व शस्त्रांची तस्करी करण्यासाठी पाकिस्तानातून पंजाबमध्ये ड्रोन पाठविण्याचे प्रकार दररोज घडत आहेत. पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यातील फिरोजपूर क्षेत्रामध्ये बुधवारी रात्री घुसखोरी केलेले पाकिस्तानचे ड्रोन बीएसएफ जवानांनी गोळीबार करून पाडले.
भारत व पाकिस्तानच्या सीमेवर पंजाबमध्ये हरभजन सीमा चौकीजवळ सीमेपलीकडून एका ड्रोनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे निदर्शनास आले. जवानांनी गोळीबार करून हे ड्रोन पाडले. गुरुवारी सकाळी शोध घेतला असता ते एका शेतात कोसळल्याचे आढळून आले. या ड्रोनसोबत अमली पदार्थ किंवा शस्त्रांची पाकिटे होती का? याचा शोध घेण्यात येत आहे. थंडीत रात्री व सकाळच्या प्रहरात दाट धुके असल्याने त्याचा फायदा घेऊन सीमेपलीकडून ड्रोन भारतीय हद्दीत पाठविली जातात.
यंदा ड्रोन घुसखोरीच्या २०० घटनायंदाच्या वर्षी पाकिस्तान लगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर २००पेक्षा अधिक पाकिस्तानी ड्रोननी भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे पंजाब पोलिसांनी सांगितले. गेल्या महिनाभरात आठ पाकिस्तानी ड्रोन बीएसएफने गोळीबार करून पाडली. पंजाबमधील अमृतसर, तरणतारण, फाजिल्का जिल्ह्यांत पाकिस्तान लगतच्या सीमेवर ड्रोन घुसखोरीच्या घटना वारंवार घडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.