लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: नीट परीक्षेबाबत आज आणखी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. नीट रद्द करावी, परीक्षेतील कथित गैरप्रकारांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) किंवा अन्य संस्थेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
आजची याचिका नीट परीक्षा दिलेल्या २० विद्यार्थ्यांनी दाखल केली आहे. या याचिकेत एनटीए आणि इतरांना नव्याने परीक्षा घेण्याचे निर्देश देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. नीटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या वेगवेगळ्या याचिकांवर शुक्रवारी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीवर केंद्र आणि एनटीएकडून उत्तर मागवले होते. परीक्षेतील व्यापक गैरप्रकार पाहता फेरपरीक्षेमुळे केवळ पात्र विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशास मदत होईल, असे विधीज्ञ धीरज सिंह यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या नव्या याचिकेत म्हटले आहे.
६२० हून अधिक गुण घेणाऱ्याऱ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पडताळा परीक्षेतील गैरप्रकारांची सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र संस्था किवा या न्यायालयाच्या देखरेखीखाली समितीद्वारे सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.
६२० किंवा त्याहून अधिक गुण मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीची पडताळणी तसेच न्यायवैद्यक विश्लेषण करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
नीटला गालबोट लागण्यास एनटीए जबाबदार : द्रमुक
चेन्नई: नीट परीक्षेच्या पावित्र्याला गालबोट लागण्यास राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) जबाबदार आहे, असे तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष द्रमुकने म्हटले आहे. नीटवरून एवढा गहजब सुरू असताना 'हाताची घडी तोंडावर बोट' ठेवून भाजप प्रणित केंद्र सरकार कोट्यवधी रुपयांची कमाई करणाऱ्या कोचिंग क्लासेसना पाठिंबा देत असल्याचा आरोपही केला.