लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘आयफोन’च्या यशस्वी उत्पादन प्रकल्पानंतर ॲपलच्या जगप्रसिद्ध आयपॅडचे उत्पादनही तामिळनाडूत करण्याच्या योजनेवर फॉक्सकॉन काम करीत आहे.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, तैवानची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असलेल्या फॉक्सकॉनची तामिळनाडूतील श्रीपेरुंबुदूर येथे ‘आयफाेन’चा जुळणी प्रकल्प आहे. याच प्रकल्पात ‘आयपॅड’ची जुळणी करण्याची फॉक्सकॉनची योजना आहे. फॉक्सकॉनने आतार्पंत ॲपलसाठी केवळ स्मार्टफोनच्या जुळणीचेच काम केले आहे. मात्र आता उत्पादन विस्तार करून आयपॅडही उत्पादित करण्यावर कंपनी गांभीर्याने विचार करीत आहे.
क्षमता दुप्पट
या प्रकल्पाबाबत सरकारसोबत चर्चेच्या काही फेऱ्याही यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. आगामी काही वर्षांत आयपॅड आणि इतर काही उत्पादने निर्मित करून आपली क्षमता दुप्पट करण्याची कंपनीची योजना आहे. सूत्रांनी सांगितले की, ‘मॅक’ रेंजच्या लॅपटॉपचे उत्पादन करण्यासाठी कंपनीला काही वेळ लागू शकतो. कारण त्यासाठी मोठ्या प्रकल्पाची गरज आहे. तथापि, आयपॅडचे उत्पादन स्मार्टफोनच्या सुविधेतच केले जाऊ शकते. त्यासाठी वेगळी सुविधा निर्माण करण्याची गरज नाही.