प्रयागराज – मागील महिन्यात झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांनी सत्ता राखण्यात यश मिळवल्याचं दिसून आले. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात भाजपाचं सरकार स्थापन झाले. योगी आदित्यनाथ यांच्या यशस्वी कामगिरीमुळे राष्ट्रीय राजकारणतही त्यांना नवी जबाबदारी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपाला आनंदाची बातमी मिळाली आहे.
४० वर्षात पहिल्यांदाच उत्तर प्रदेश विधान परिषदेत एका पक्षाला बहुमत मिळालं आहे. भारतीय जनता पार्टीच्या नावावर हा रेकॉर्ड नोंद झाला आहे. याआधी १९८२ मध्ये काँग्रेसकडे पूर्ण बहुमत होते. उत्तर प्रदेश विधान परिषदेत १०० जागा आहेत. त्यातील ३६ जागांवर निवडणुका घेण्यात आल्या. यातील ९ जागा भाजपानं बिनविरोध जिंकल्या आहेत. तर २७ जागांवर मतदान घेण्यात आले. त्यातील २४ जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे. ३ जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.
विधान परिषदेत बहुमताचा आकडा ५१ आहे. आता भाजपाचे एकूण ६७ आमदार विधान परिषदेत आहे. म्हणजे बहुमतापेक्षा १६ जागा भाजपाकडे जास्त आहेत. निकालानंतर विधान परिषदेत भाजपा ६७, समाजवादी पार्टी १७, बसपा ४, काँग्रेस १ आणि अपना दल १ त्याशिवाय २ शिक्षक आमदार, ५ अपक्ष आमदार आणि एक निषाद पार्टीचे आमदार आहेत. तर २ जागा रिक्त आहेत. २००४ मध्ये मुलायम सिंह मुख्यमंत्री होते तेव्हा समाजवादी पार्टीने ३६ पैकी २४ जागा जिंकल्या होत्या. २०१० मध्ये मायावती मुख्यमंत्री होत्या तेव्हा बसपाने ३४ जागा जिंकल्या होत्या.
२०१६ मध्ये अखिलेश यादव मुख्यमंत्री होते तेव्हा समाजवादी पक्षाने ३१ जागा जिंकल्या होत्या. त्यातील ८ जागांवर सपाचे बिनविरोध सदस्य निवडून आले होते. २०१८ मध्ये १३ जागांसाठी बिनविरोध निवडणुका झाल्या. त्यात योगी आदित्यनाथ, केशव प्रसाद मौर्य, डॉ. दिनेश शर्मा यांच्यासह भाजपाचे १० आमदार निवडून आले. २०२० मध्ये शिक्षक मतदारसंघात निवडणुका झाल्या. त्याठिकाणी ६ पैकी ३ भाजपा, १ सपा आणि २ ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला. २०२० मध्ये ५ जागांसाठी निवडणूक झाली त्यातील ३ भाजपाने जिंकल्या होत्या.