Pooja Khedkar ( Marathi News ) : चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तर्ण होऊन अधिकारी झालेल्या पूजा खेडकर या तरुणीवर आता यूपीएससीने पुन्हा एकदा कठोर कारवाई केली आहे. पूजा खेडकरला आयएएस सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात खटला सुरू असताना यूपीएससीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
यूपीएससीने मागील आठवड्यातच पूजा खेडकर हिची उमेदवारी रद्द केली होती. परंतु तेव्हा काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर आता तिला आयएएस सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पूजा खेडकरनं देशातील सर्वात प्रतिष्ठेची आयएएस परीक्षा पास केली होती. ऑल इंडिया रँकिंगमध्ये ती ८४१ क्रमांकाने उत्तीर्ण झाली. त्यानंतर ट्रेनिंग घेत असिस्टेंट कलेक्टर या पदावर ज्वाईन झाली होती. परंतु गाडीवर लाल दिवा लावण्याची इच्छा आणि अतिरिक्त कलेक्टरच्या चेंबरवर कब्जा करण्याचा प्रयत्न यामुळे तिचा सर्वच खेळ उघड झाला. पूजा खेडकर त्यावेळी चर्चेत आली जेव्हा तिने तिच्या खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावला आणि पुण्याचे अतिरिक्त कलेक्टर सुहास दिवासे यांच्या चेंबरवर कब्जा केला. दिवासे यांनी याबाबत तक्रार केली. त्यानंतर त्यांची बदली वाशिमला झाली.
पूजा खेडकर चर्चेत आल्यानंतर तिच्या आयएएस बनण्याचा प्रवास तपासला गेला. त्यानंतर एक एक करून अनेक खोट्या कथा समोर आल्या. पूजानं यूपीएससीच्या कोट्यात येण्यासाठी ओबीसीचं बनावट प्रमाणपत्र जमा केले होते. तिने केवळ ओबीसी प्रमाणपत्रच नव्हे तर दिव्यांग असल्याचा खोटा दाखलाही दिला होता. पूजा खेडकरनं स्वत: दृष्टीने कमकुवत आहे असा दावा केला होता. काही गोष्टी तिला आठवणीत राहत नाही अशी मानसिक अवस्था असल्याचं सांगितले होते. यूपीएससीत अशा विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग कोटा असतो.
केवळ सरकारी हॉस्पिटलचा रिपोर्ट यूपीएससीला बंधनकारक असतो. त्यानंतर यूपीएससीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला. पूजाच्या मेडिकल चाचणीसाठी ६ वेळा एम्सच्या डॉक्टरांची वेळ घेतली, मात्र काही ना काही बहाणा करून ती चाचणीपासून वेळ काढत होती. जेव्हा तपास पूर्ण झाला तेव्हा पूजाचं मानसिक सर्टिफिकेट बनावट असल्याचं उघड झालं. इतकेच नाही तर २०२० मध्ये पूजानं सेंट्रल एडमिनिस्ट्रेटिवह ट्रिब्यूनलसाठी दिलेल्या अर्जात तिचं वय ३० दाखवलं होते. मात्र २०२३ साली दिलेल्या अर्जात वय ३१ होते. पूजानं स्वत:चं आणि आई वडिलांचं नाव बदलून अनेकदा यूपीएससी परीक्षा दिली. ओबीसी उमेदवार केवळ ९ वेळा परीक्षा देऊ शकतो परंतु पूजाने त्याहून अधिक वेळा परीक्षा दिली.