Farooq Abdullah Jammu Kashmir INDIA Opposition Alliance: उत्तर प्रदेशमध्ये जयंत चौधरी आणि पंजाबमध्ये भगवंत मान यांच्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीला आणखी एक धक्का बसला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमधील लोकसभेच्या पाचही जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. फारुख अब्दुल्ला हे इंडिया आघाडीच्या बैठकांना सुरुवातीपासून हजेरी लावत होते. मात्र अचानक त्यांनी असा निर्णयाने घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी फारूख अब्दुल्ला यांना मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीने समन्स बजावले होते. त्याचाच परिणाम म्हणून अब्दुल्ला यांनी आज असा निर्णय घेतला असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
पश्चिम बंगाल, पंजाब आणि दिल्लीत आप पक्षाने तसेच तृणमूल काँग्रेसने यापूर्वीच इंडिया आघाडीला धक्का दिला आहे. उत्तर प्रदेशातही समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात चर्चा होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत फारुख अब्दुल्ला यांच्या या निर्णयामुळे भारताची आघाडी आणखी कमकुवत होणार आहे.
दिल्लीत काँग्रेसला फक्त एक जागा
आम आदमी पार्टीच्या पीएसीच्या बैठकीनंतर दिल्लीत काँग्रेसला एक जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. आपचे खासदार आणि संघटनेचे सरचिटणीस संदीप पाठक म्हणाले की, आम्ही दिल्लीत काँग्रेसला १ जागा देऊ करत आहोत आणि आम आदमी पार्टी लोकसभेच्या ६ जागांवर निवडणूक लढवणार आहे. इंडिया आघाडीत काँग्रेसच्या जागावाटपाच्या विलंबाबाबत, आप खासदार आणि संघटनेचे सरचिटणीस संदीप पाठक म्हणाले, “आम्ही युतीमध्ये आलो तेव्हा आमच्या स्वतःच्या हिताचा विचार करण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्ही प्रामाणिकपणा आणि समर्पणाने आघाडीमध्ये आहोत. INDIA चा उद्देश निवडणूक लढवणे आणि देशाला नवा पर्याय देणे हा आहे. उमेदवार वेळेवर जाहीर करणे, प्रचाराची रणनीती ठरवणे हेदेखील यात अपेक्षित आहे."
उत्तर प्रदेश, बंगाल, आसाममध्येही धुसफूस
नुकतेच आम आदमी पक्षाने आसाममधील लोकसभेच्या ३ जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव काँग्रेसला ८० जागांपैकी केवळ ११ जागा देण्याचे बोलत आहेत. पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी यांनीही एकट्याने निवडणूक लढविण्याची भाषा केली आहे. अशा परिस्थितीत इंडिया आघाडी आता किती प्रभावीपणे भाजपाला विरोध करू शकते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.