श्रीहरीकोटा - चंद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेनंतर आता पुन्हा एकदा इस्रोने अवकाशात ७ उपग्रह सोडले आहेत. सिंगापूर येथील PSLV-C56 आणि इतर ६ उपग्रहांचे हे प्रक्षेपण श्रीहरी कोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले. पीएसएलव्ही रॉकेटचे हे ५८ वे उड्डाण असून इस्रोने भारताच्या अवकाशयान मोहिमेत आणखी एक दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे.
इस्रोचे हे पूर्णत: व्यवसायिक मिशन आहे, न्यूस्पेस इंडिया लिमिटेडद्वारे हे मिशन पूर्णत्वास नेले जात आहे. यासाठी, शनिवारपासूनच उलट मोजणी म्हणजेच काऊंटडाऊ सुरू करण्यात आलं होतं. ३६० किलो वजनाचे डीएसआर उपग्रह हा सिंगापूर सरकारची संस्था डीएसटीए आणि सिंगापूरमधील एका कंपनीच्या एसटी इंजिनिअरिंगद्वारे संयुक्तपणे विकसित करण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वी एप्रिल महिन्यात सिंगापूर येथून पीएसएलव्ही-सी५५ टेलियोज-२ मिशन अंतराळात पाठवण्यात आले होते. त्यामुळे, हे पीएसएलव्हीचे ५८ वे उड्डाण असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. तर, काही दिवसांपूर्वीच भारताने जगाचं लक्ष्य लागलेल्या चंद्रयान ३ मोहिमेला सुरूवात केली असून त्याचे यशस्वी उड्डाणही झाले आहे. विशेष म्हणजे याच महिन्यात हे चंद्रयान चंद्रावर उतरणार आहे. त्यामुळे, भारतीयांना इस्रोचा अभिमान वाटतो. तर, जगभरातील स्पेस इंडस्ट्रीत इस्रोचा वेगळाच दबदबा निर्माण झालाय.
दरम्यान, या ७ उपग्रहांच्या यशस्वी उड्डाणानंतर इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी इस्रोच्या टीमचे अभिनंदन केलं आहे. तसेच, सिंगापूर सरकारचे आणि सिंगापूरमधील संबंधित कंपनी व यंत्रणांचेही सोमनाथ यांनी या यशस्वी मोहिमेबद्दल अभिनंदन केले.