रांची : चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड सरकार अडचणीत सापडलं असून मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज झालेले काँग्रेस आमदार सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतात. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर चंपाई सोरेन यांच्याकडे राज्याची सूत्रे आली आहेत. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर सरकार टिकवण्याचं आव्हान चंपाई सोरेन यांच्यासमोर उभं ठाकलं आहे.
झारखंडमधील काँग्रेसचे १७ पैकी १२ आमदारांची आज रांची इथं एक गुप्त बैठक झाली. काँग्रेसला वाट्याला आलेल्या चार मंत्रिपदावरील व्यक्तींना बदललं नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच आम्ही राज्य सोडून बाहेर जाऊ, अशा इशारा यापूर्वीच काँग्रेसच्या नाराज आमदारांनी दिला आहे. नाराज असलेले काँग्रेस आमदार नवी दिल्ली इथं जाऊन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भेट घेण्याचीही शक्यता आहे. त्याआधीच चंपाई सोरेन हे दिल्लीला रवाना झाले असून त्यांच्यासोबत जेएमएमचे वरिष्ठ नेते विनोद कुमार पांडे, सुप्रियो भट्टाचार्य आणि आमदार सदिव्य कुमार सोनू हेदेखील आहेत.
काँग्रेसच्या मंत्र्यांना बदलून त्याऐवजी दुसऱ्या आमदारांना संधी द्यावी, अशी या नाराज आमदारांची मागणी आहे. या मुद्द्यावरून सरकारवर नाराज झालेले काँग्रेसचे १२ आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जयपूर किंवा बंगळुरू इथं जाऊ शकतात.
दरम्यान, काँग्रेस आमदारांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अडचणीतून मुख्यमंत्री चंपाई सोरेन आणि काँग्रेस नेतृत्व कसा मार्ग काढतात, हे पाहणं औत्सक्याचं ठरणार आहे.