जम्मू-काश्मीरमध्ये सर्वसामान्यांवर होणारे दहशतवादी हल्ले थांबण्याचे नाव नाही. आज, बडगाममध्ये वीटभट्टीवर काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांवर हल्ला झाला. यात 1 मजुराचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी झाला असून त्याला श्रीनगर येथील SMHS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचास सुरू आहेत. हा दहशतवादी हल्ला बडगाममधील मगरेपोरा चडूरा भागात झाला. या हल्ल्यात जीव गमावलेल्या मजुराचे नाव दिलखुश, असल्याचे सांगण्यात येत आहे. तो बिहारचा रहिवासी होता. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर अथवा काश्मीर बाहेरील हिंदूंवरील हल्ले वाढले आहे.
गेल्या महिन्यात अशा तीन घटना घडल्या. यामुळे तेथील अल्पसंख्यक चिंतित आहेत. आज (2 जून) दहशतवाद्यांनी कुलगाममध्ये एका बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या केली. विजय कुमार असे मृत मॅनेजरचे नाव आहे. ते मुळचे राजस्थानमधील हनुमानगडचे होते.
1 मे पासून आतापर्यंत 9 'टार्गेट किलिंग' -जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचे नाव नाही. जम्मू-काश्मीरमध्ये 1 मे ते 2 जून या कालावधीत 9 जणांना टार्गेट करण्यात आले आहे. खोऱ्यात सातत्याने होत असलेल्या टार्गेट किलिंगवरून विरोधक मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. कुलगाममध्ये एका काश्मिरी पंडित शिक्षिकेच्या हत्येनंतर दोन दिवसांनी दहशतवाद्यांनी दिलखुश आणि विजय कुमार यांची हत्या केली आहे. यापूर्वी 31 मे रोजी जम्मूमध्ये रजनी बाला (36) यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. कुलगामच्या गोपालपुरा जिल्ह्यातील एका शाळेत त्या शिक्षिका होत्या.मे महिन्यात दहशतवाद्यांनी 7 टार्गेट किलिंग केल्या. सर्वात आधी 12 मे रोजी दहशतवाद्यांनी राहुल भट्ट नावाच्या काश्मिरी पंडिताची हत्या केली. यानंतर 25 मे रोजी कलाकार अमरीन भट्ट यांचीही हत्या करण्यात आली. याशिवाय तीन ऑफ ड्युटी पोलीसांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली होती.